हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
27 जुलैपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्याच महिन्यात आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघामधील हार्दिक पंड्याची कामगिरी अविस्मरणीय ठरली होती. ही स्पर्धा संपल्यानंतर तो काही वैयक्तिक समस्यांमुळे झिंबाब्वेच्या दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन अनुभवी क्रिकेटपटूंनी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. लंकेविरुध्द होणाऱ्या मालिकेसाठी हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 27 ते 30 जुलै दरम्यान पल्लीकेली येथे खेळविली जाणार आहे. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका कोलंबोत 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. लंकन दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या दोन दिवसांमध्ये केली जाणार आहे. या दौऱ्यामध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिल किंवा सूर्यकुमार यादव यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. झिंबाब्वेच्या दौऱ्यामध्ये गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. तर गेल्या वर्षी द. आफ्रिका विरुध्द झालेल्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपविण्यात आले होते.
खेळाडूंना इशारा
देशामध्ये होणाऱ्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये क्रिकेटपटूंनी आपला सहभाग दर्शविण्याची सक्ती बीसीसीआयतर्फे करण्यात आली आहे. हा नियम अव्वल आणि वरिष्ठ क्रिकेटपटूंनाही लागू राहिल, असे प्रतिपादन संघटनेचे सचिव जय शहा यांनी केले आहे. एखाद्या दौऱ्यासाठी क्रिकेटपटूची निवड झाली असेल तर त्याला राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास सक्ती राहणार नाही. मात्र भारतीय संघातील महत्वाचे खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रित बुमराह यांच्यावर ही सक्ती राहणार नाही, असा खुलासा शहा यांनी केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील एक किंवा दोन सामने खेळणे जरुरीचे आहे.