हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन
आगामी हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात नवा अध्याय : रोहित शर्माची कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्तता
वृत्तसंस्था/ मुंबई
पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली आहे. तब्बल दशकभर मुंबईचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून हार्दिक पंड्याच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. आयपीएलच्या नव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्याआधी ही मोठी घडामोड घडली आहे.
शुक्रवारी मुंबई इंडियन्सने निवदेन जारी करत हार्दिक पंड्याच्या नावाची कर्णधारपदी घोषणा केली आहे. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह, रिकी पाँटिंगपासून रोहित शर्मापर्यंत अनेक गुणवान खेळाडूंनी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केले आहे. प्रत्येक कर्णधारानं त्या-त्या वेळी संघाच्या यशात योगदान दिले. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने नेहमीच भविष्याचा वेध घेत त्यासाठी तयार राहण्याचे प्रयत्न केले आहेत. संघ बांधणीवर जोर दिला आहे. आता ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली असून आयपीएल 2024 साठी मुंबईचे कर्णधारपद हार्दिक सांभाळेल, असे मुंबई इंडियन्सचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सांगितले.
रोहितचे मुंबईने मानले आभार, नेहमीच आमचा कर्णधार राहशील असे म्हणत केली कृतज्ञता व्यक्त
24 एप्रिल 2013 रोहित तू मुंबईचा कर्णधार झालास... रोहितने विश्वास ठेवायला शिकवले, कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची उर्जा दिली. रोहितच्या नेतृत्वामुळे संघाने फक्त यश मिळवलं नाही तर तो आयपीएलमधील एक सर्वोत्तम कर्णधार ठरला. जरी रोहित आता कर्णधार नसला तरी मुंबई इंडियन्सला आणखी मजबूत करण्यासाठी मैदानावर आणि मैदानाबाहेर रोहितचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्वाचे आहे. रोहितकडे अनुभवाची शिदोरी आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो, अशा शब्दांत जयवर्धने यांनी रोहितचे कौतुक केले.
हार्दिकच्या नेतृत्वात नवा अध्याय
रोहित शर्मा मागच्या एका वर्षापेक्षा अधिक काळापासून एकही आतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला नाहीये. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे मागच्या हंगामात नेतृत्व केले होते. पण दिग्गज स्वत: आगामी हंगामात कर्णधार म्हणून खेळण्यासाठी इच्छुक दिसत नाहीये. याच कारणास्तव मुंबईने काही दिवसांपूर्वी हार्दिकला पुन्हा एकदा संघात सामील केले. मुंबईने आयपीएल लिलावापूर्वीच गुजरात टायटन्समधून हार्दिकला 15 कोटी रुपयांच्या फूल कॅश ट्रेड केले होते. तेव्हापासूनच हार्दिकच्या कर्णधारपदाबाबत चर्चा रंगली होती. अखेर शुक्रवारी यावर मुंबई इंडियन्सने शिक्कामोर्तब केलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये नव्या अध्यायाला सुरुवात करेल.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई पाचवेळा चॅम्पियन
रोहित शर्माने 2013 साली मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावले. आयपीएलच्या इतिहासातील हा एक विक्रम आहे. मुंबई इंडियन्स 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये चॅम्पियन ठरली होती. दरम्यान, रोहित हा पुढच्या हंगामात मुंबईचा कर्णधार नसला तरी तो या संघाचा एक भाग नक्कीच असेल. हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित हा एक खेळाडू म्हणून खेळू शकतो. त्यामुळे कर्णधारपद गेले असले तरी रोहित हा मुंबईचा खेळाडू नक्कीच असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रोहित पर्वाचा अस्त
रोहित शर्माने तब्बल 10 वर्षं मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. त्यात त्याने 5 वेळा संघाला आयपीएल जिंकून दिला. रोहित शर्माच्या या कामगिरीची बरोबरी करणं फक्त महेंद्रसिंग धोनीला शक्य झालं आहे. दरम्यान, रोहित आता 36 वर्षांचा आहे. मागील काही काळापासून तो टी 20 क्रिकेटपासून दूर आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकपनंतर रोहित ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेत सहभागी झाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने रोहितला आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करण्यास सांगितले आहे. पण अद्याप त्याने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. तो आता आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत सहभागी होणार आहे. यानंतर नव्या वर्षात अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेदरम्यान रोहित आपला निर्णय जाहीर करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या व केएल राहुल, सुर्यकुमार यादव हे पर्याय बीसीसीआयकडे आहेत. यातच मुंबई इंडियन्सने भविष्याचा विचार करत हार्दिककडे जबाबदारी सोपवली आहे. यामुळे आगामी काळात टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन देखील नवा असणार आहे.