हरदीप बनला ग्रीको-रोमन वर्ल्ड चॅम्पियन
वृत्तसंस्था/ अथेन्स
भारताच्या 16 वर्षांचा मल्ल हरदीपने यू-17 वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत भारतासाठी सर्वात जास्त वजनी गटातील ग्रीको रोमन सुवर्णपदक पटकविले. विनोद कुमार (45 किलो, 1980), पप्पू यादव (51 किलो, 1992) आणि सूरज (55 किलो, 2022) यांनी यापूर्वी सुवर्णपदके पटकावली होती.
दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिचे जन्मस्थान असलेल्या हरियाणाच्या झाज्जर जिह्यातील रहिवासी असलेला किशोर हरदीपने अथेन्समध्ये ग्रीको रोमन 110 किलो वजनी गटातील जागतिक किताब पटकवत पुन्हा एकदा जागतिक नकाशावर आपल्या गावाचा लौकीक वाढवला. 17 वर्षांखालील आशियाई विजेता हरदीपने कझाकस्तानच्या बत्तूर सोवेतखानचा 2-0, पोलंडच्या मातेउझ टोमेल्काचा 4-2, युक्रेनचा अनातोली नोवाचेन्कोचा 9-0 आणि तुर्कीचा एमरुल्लाह कॅप्कनचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत इराणी याझदान रेझा डेलरोझचा 3-3 (क्रायटेरियाच्या आधारे) असा पराभव करून भारतासाठी या स्पर्धेतील एकमेव ग्रीको रोमन पदक मिळवले.