For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलेच्या ‘माहेरघराचा’ सरकारी ‘सासरवाडी’त छळ!

03:04 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कलेच्या ‘माहेरघराचा’  सरकारी ‘सासरवाडी’त छळ
Advertisement

कला अकादमी वाचविण्यासाठी कलाकार एकवटले: पणजीत आजच्या बैठकीत ठरणार रणनीती

Advertisement

पणजी : कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या ‘कला अकादमी’ वास्तूचा गेल्या काही वर्षांपासून सरकारी सासरवाडीत चाललेला छळ सध्या असह्य पातळीवर पोहोचला असून या  ‘सासू-सासऱ्यांच्या’ जाचातून तिला वाचविण्याच्या निर्धाराने आता कलाकार एकवटले आहेत. या कृतीचे पहिले पाऊल म्हणून आज दि. 17 रोजी सायंकाळी 4 वा. पाटो पणजी येथील श्रमशक्ती भवनच्या सहाव्या मजल्यावरील गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टच्या  कार्यालयात बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी राज्यभरातील कलाकार  एकवटणार असून या सांस्कृतिक वास्तूच्या महत्त्वाच्या खुणा संरक्षित करण्याच्या मागणीसाठी प्रभावी रणनीती आखण्यात येणार आहे.

खर्च शंभर कोटींच्या घरात?

Advertisement

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून दुऊस्तीच्या नावाखाली ही वास्तू बंद ठेवण्यात आली असून तिच्या कथित आजारपणावर आतापर्यंत करण्यात आलेला खर्च तब्बल 100 कोटींच्या घरात पोहोचत आला आहे. तरीही तिची स्थिती सुधारण्याचे नाव घेत नसल्यामुळे राज्यभरातील कलाकारांमधून संतापाची लाट उसळली आहे.

उद्रेक होण्याचीही भीती 

ही वास्तू खुली करावी यासाठी आतापर्यंत अनेक कलाकारांनी मागणीवजा आवाज उठविला आहे. तरीही संवेदनहीन सरकार कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, असेच आतापर्यंतची चालढकल पाहता दिसून येत आहे. त्यामुळे कलाकारांच्या संतापाचा उद्रेक होण्याचीही भीती वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी आज होणारी बैठक ही आंदोलन किंवा निषेध म्हणून नाही. या बैठकीच्या निमित्ताने राज्यभरातील कलाकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांचे विचार-मते ऐकणे, तसेच राज्याची ही सांस्कृतिक खुण संरक्षित आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रभावी रणनीती आखणे हा बैठकीचा उद्देश आहे, असे कलाकारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘एकांडे शिलेदार’ राजदीप

राज्यातील प्रसिद्ध नाट्या कलाकार राजदीप नाईक यांनी याप्रकरणी सर्वप्रथम आवाज उठविला होता. त्याशिवाय सोशल मीडियावरील आपल्या प्रसिद्ध सदरातून त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. त्याही पालिकडे जाताना हल्लीच संधी मिळाली तेव्हा त्यांनी खुद्द याच वास्तुच्या व्यासपीठावरून सरकारला खडे बोल सुनावले होते. मात्र याकामी ते ‘एकांडे शिलेदार’ ठरत असल्याने त्यांच्या दबावाचा प्रभाव सरकारवर पडत नाही. कला अकादमी सुरू व्हावी यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या राजदीप नाईक यांनी यापूर्वी अनेकदा कला अकादमीकडे निवेदनवजा पत्रव्यवहार केला. परंतु त्यांना कुणाकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. अशावेळी एकांडे शिलेदार बनण्यापेक्षा सर्व कलाकारांना सोबत घेऊन आवाज उठवला तरच कला अकादमीचा ‘पडदा’ उघडेल या विश्वासाने नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याद्वारे अकादमीच्या खेदजनक स्थितीकडे सर्व कलाकारांचे लक्ष वेधणे, त्यावर त्यांचेही विचार ऐकणे व  अकादमीच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कृती करण्यास त्यांना प्रेरणा देणे. पुढील योग्य धोरण आखणे आदी उद्देश सफल होण्याची अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.