For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण भारतातील वाहनचालकांची काणकोण पोलिसांकडून सतावणूक

12:23 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण भारतातील वाहनचालकांची काणकोण पोलिसांकडून सतावणूक
Advertisement

काणकोण : कर्नाटक आणि दक्षिणेकडील अन्य राज्यांतून गोव्यात येणाऱ्या, विशेषत: कर्नाटक, केरळ नोंदणी केलेली वाहने शेळी येथे अडवून त्यांची अक्षरश:पिळवणूक आणि सतावणूक गोवा पोलीस खात्याकडून करण्यात येत असून यासंबंधी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दक्षिण गोव्याच्या अधीक्षक सुनीता सावंत यांनी लक्ष द्यावे, अन्यथा कारवार येथे गोव्यातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाईल आणि खास तपासणी नाका उभारला जाईल, असा इशारा कारवारचे आमदार सतीश सैल यांनी दिला आहे.कारवार आणि खास करून काणकोणचे व्यावसायिक, सांस्कृतिक संबंध आहेत, हे सर्वांना ठावूक आहे. गोव्यात येणाऱ्या सर्व वाहनांची पोळे चेकनाक्यावर कसून तपासणी केली जात असताना पुढे शेळी, गालजीबाग पूल, चार रस्ता या ठिकाणी या वाहनांना अडविण्यात येते.

Advertisement

त्यांच्याकडून मिळेल तशी रक्कम विनाकारण उकळली जाते. त्यातून गोव्याचे नाव खराब होत असतानाच त्यांचा विनाकारण वेळही वाया जातो. ही नुसती पिळवणूक आहे,असा आरोप सैल यांनी केला.गोव्यातील भाविक मोठ्या प्रमाणात धर्मस्थळ, गोकर्ण, मुर्डेश्वर त्याचप्रमाणे दक्षिणेतील अन्य देवस्थानांना भेट देण्यासाठी जात असतात. गोमंतकीय कारवार, हुबळी या ठिकाणी व्यापारासाठीही जातात. अशा वाहनांची कारवार तसेच अन्य भागांतील पोलीस विशेष तपासणी करीत नाहीत. एकदा माजाळी चेकनाक्यावर तपासणी झाली की, हे वाहनचालक सरळ पुढचा प्रवास करतात. मग काणकोणलाच ही अशी परिस्थिती का निर्माण होते, असा सवाल आमदार सैल यांनी केला आहे आणि यावर त्वरित निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.