हर हर शंभो...
हिंदू धर्मामध्ये अमरनाथ यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी लाखो लोक ‘हर हर शंभो’चा गजर करीत अमरनाथ यात्रेला जात असतात. यंदा 3 जुलैपासून या यात्रेला प्रारंभ झाला आहे. अवघ्या आठवडाभरात यात्रेला तब्बल 1 लाख भाविकांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते. हिमालयात तब्बल 13 हजार फुटाहून अधिक उंचीवर असलेल्या अमरनाथचा मार्ग हा अतिशय खडतर मानला जातो. तिथवर पोहोचणे ही एकप्रकारे शारीरिक व मानसिक परीक्षाच असते. किंबहुना शिवनामाच्या बळावर भाविक ही यात्रा पूर्ण करतात. 9 ऑगस्टपर्यंत म्हणजे साधारण महिनाभर ही यात्रा चालेल. यंदाच्या यात्रेला पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या वर्षी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे दिसून येते. मागच्या 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगामला लक्ष्य केले होते. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकमध्ये युद्धसंघर्षही झाल्याचे पहायला मिळाले. या संघर्षात भारताने पाकिस्तानला जबर तडाखा दिला असला, तरी त्यामुळे पाकच्या कुरापती थांबतील, असे मानायचे कारण नाही. समोरासमोरील युद्धात आपण भारताचा सामना करू शकत नाही, याची पाकला कल्पना आहे. त्यामुळे छुप्या युद्धावर अर्थात दहशतवादी हल्ल्यांवर या राष्ट्राचा भर असतो. अमरनाथ यात्रेलाही यापूर्वी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. हे लक्षात घेऊन अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेमध्ये झालेली मोठी वाढ, ही क्रमप्राप्तच ठरावी. यात्रा मार्गावर या वर्षी मोठ्या प्रमाणात सैन्य दिसते. बालताल आणि पहलगाम अशा दोन्ही मार्गांवर सुरक्षा असून, पोलीस व निमलष्करी दले तैनात आहेत. पॅम्पभोवती तर मोठा बंदोबस्त असून, डोळ्यात तेल घालून पहारा दिला जात आहे. यात्रेदरम्यान 581 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. तसेच प्रत्येक मार्गावर एक राष्ट्रीय रायफल्स बटालियनची नियुक्ती करण्यात आल्याचे पहायला मिळते. एका बटालियनमध्ये साधारण एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक जवान असतात. याशिवाय सैन्याच्या स्पेशल तुकड्या, हवाई दलाच्या तुकड्याही दिसतात. उपग्रह, मानवरहित हवाई वाहने, रडारच्या जाळ्याचाही उपयोग करण्यात येत आहे. शिवाय मार्गावर 80 ते 85 ड्रोनही सज्ज असून, ड्रोनविरोधी प्रणालीही तैनात ठेवण्यात आली आहे. अमरनाथचा मार्ग हा डोंगरदऱ्यातून जातो. त्यामुळे या भागात सुरक्षेचे उपाय योजने हीदेखील एक कसोटी असते. मात्र, पहलगामचा अनुभव लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही कसर ठेवलेली नाही. पहलगाममध्ये सुरक्षेच्याबाबतीत कमालीची हेळसांड झाली होती. हल्ला झाला, तेव्हा जवळपास सुरक्षा यंत्रणांमधील कुणीही नसल्याची माहिती समोर आली होती. ही बाब हेरूनच दहशतवाद्यांकडून या ठिकाणाला लक्ष्य केले होते. त्यामुळे आता अमरनाथ यात्रेसंदर्भात सरकार व सुरक्षा यंत्रणांकडून कमालीची दक्षता घेण्यात येत आहे. तपासणी नाके, पॅमेरे, नियंत्रण कक्ष तसेच अत्याधुनिक यंत्रणांचा वापर हा त्याचाच भाग म्हणता येईल. अमरनाथ यात्रेचे मुख्य वैशिष्ट्या म्हणजे नैसर्गिकरीत्या तयार होणारे बर्फाचे शिवलिंग. हे शिवलिंग दरवर्षी श्रावण महिन्यात अमरनाथ गुहेत तयार होते. अमरनाथमधील गुहेत साकारणाऱ्या या शिवलिंगाचे दर्शन हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. त्यामुळे लाखो लोक येथे येत असतात. एकदा तरी शिवलिंगाचे दर्शन घ्यावे, ही प्रत्येकाची मनोकामना असते. दरवर्षी या स्थळाला देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. किंबहुना जम्मू काश्मीर राज्यातील हा भाग सुरक्षेच्या दृष्टीनेही संवेदनशील मानण्यात येतो. दहशतवादी कारवायांमुळे 90 च्या दशकात ही यात्रा जवळपास स्थगितच करण्यात आली होती. 2000 मध्ये पहलगाममधील बेस पॅम्पचे संरक्षण करणाऱ्या सीआरपीएलला सशस्त्र अतिरेक्यांनी लक्ष्य केले होते. त्यात दोन पोलिसांसह 27 जण ठार झाले होते. 2001 मध्ये संशयित अतिरेक्यांनी पॅम्पवर हातबॉम्ब फेकल्याने 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2002 मध्ये नुनवान येथील पॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 50 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याशिवाय अनेकदा यात्रेकरूंना येथून दहशतीच्या वातावरणातूनच मार्ग काढावा लागला आहे. भारतीयांच्या दृष्टीने अमरनाथ यात्रेला किती महत्त्व आहे, हे पाकिस्तान व पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी जाणतात. त्यामुळेच या अतिरेकी प्रवृत्तींचा या यात्रेवर कायम डोळा राहिला आहे. ही पार्श्वभूमी व सीमेवरील तणाव बघता आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागेल. मुख्य म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर यात्रा रद्द न करता कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पाडण्याचा निर्णय योग्यच होय. विशेष म्हणजे भाविकांनीही त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पहिली लढाई आपण जिंकली आहे, हे नक्की. या यात्रेला स्थगिती दिली गेली असती, तर त्यातून वेगळा संदेश गेला असता. त्यातून दहशतवाद्यांचे मानसिक बळ वाढले असते. ती संधी न देता भारताने घेतलेला पवित्रा म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरतो. अमरनाथ यात्रेदरम्यान बर्फवृष्टी, दरड कोसळणे व भूस्खलन झाल्याचीही उदाहरणे आहेत. 1996 मध्ये झालेल्या अशाच एका दुर्घटनेत मोठी प्राणहानी झाली होती. तसेच अनेक भाविक व पर्यटकही अडकून पडले होते. मागच्या काही वर्षांत ग्लोबल वार्मिंगमुळे नैसर्गिक संकटांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ढगफुटी, बर्फ वितळणे, भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सैन्य सुरक्षेबरोबरच या गोष्टीचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. नैसर्गिक संकटे ही काही सांगून येत नाही. परंतु, सज्जता असेल, तर त्याची तीव्रता कमी करता येते. हे लक्षात घेता या आघाडीवर लक्ष दिले जाईल, असे वाटते. भाविकांनीही आपापली काळजी घेत हर हर शंभोच्या गजरात यात्रा सफल, संपूर्ण करावी.