आनंदी भारत?
जागतिक आनंद दिन 20 मार्च रोजी साजरा होतो. याचदिवशी विविध देशांचा आनंद निर्देशांक गेली 10 वर्षे जाहीर होत असून त्यातून विविध देशातील लोकांचा ‘आनंद’स्तर स्पष्ट होतो. भारताची क्रमवारी शतकोत्तर असून गेल्या 10 वर्षात त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. जगातील 143 देशांच्या क्रमवारीत आपण 126 व्या क्रमांकावर असून याबाबत ‘कुछ तो गडबड है’ असे मानणारे आनंदी लोक आहेत.
आनंद निर्देशांक मापनाची पद्धती तसेच त्यासाठी वापरण्यात आलेले निकष यांचा विचार केल्यास त्याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते. प्रत्येकास आपण सुखी असावे, संपन्न असावे, आनंदी असावे अशी नैसर्गिक प्रेरणा असते. त्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता वैयक्तिक पातळीवर तसेच सामूहिक अथवा सामाजिक पातळीवर कशा प्रकारे होते हे महत्त्वाचे ठरते. यासर्व घटकांचा परिणाम म्हणून प्रत्येकास प्राप्त होणारे जीवन आनंदी होते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून विविध देशांची आनंद तुलना शक्य होते. तसेच एखादा देश कालखंडानुसार आनंद स्तर उंचावत आहे का हेही स्पष्ट होते.
आनंद पर्व प्रारंभ
देशाचा विकास व लोकांचे कल्याण मापनाबाबत केवळ राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांचाच वापर करण्यात महत्त्वाची चूक दुरुस्त करण्याचे काम आपल्या शेजारचे छोटे राष्ट्र भूतान याने केले. राष्ट्रीय उत्पन्न ऐवजी राष्ट्रीय आनंद मापन दर्शक तयार करण्याची महत्त्वाची कामगिरी भूतान नरेश व त्यांच्या शासनाने केली व त्यासाठी आनंद मंत्रालय स्थापन केले. ही भूमिका अधिक मानवी कल्याणाची असल्याने त्याला जागतिक स्तरावर युएनने किंवा संयुक्त राष्ट्र संघाने घेतली. आनंद दर्शक मोजण्यासाठी दोन वर्षे अनेक तज्ञांनी कार्य केले व जागतिक स्तरावर आनंदस्तर मापनाचे आनंदपर्व सुरू झाले. त्याला आता दशक पूर्तता होत आहे. विशेष म्हणजे भारतातही आनंद मापनास 2018 मध्ये दिल्लीकरिता मनिष सिसोदिया यांनी आनंदी पाठ्याक्रम तयार करून आठवी इयत्तेपर्यंत शिक्षणात आनंद आणला. 2016 मध्ये मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारने आनंद विभाग स्थापन केला तर 2017 मध्ये आंध्र प्रदेशने आनंद मापन सुरू केले. मानवी विकास मापनाचा HDI - Human Development Index) अधिक गुणात्मक विस्तार हा आनंद दर्शकात दिसतो.
आनंदमापन पद्धती
जागतिक आनंदी निर्देशांक World Happiness Index-WHI)मापनाची पद्धती वाल्डेन विद्यापीठाने तयार केली असून त्यासाठी व्यापक अशी दहा क्षेत्रे निवडली आहेत. यामध्ये जीवनाबाबत समाधान, आनंद भावना या आरोग्य, काम व वैयक्तिक जीवन यातील काल संतुलन (ऊग्स ँaत्aहम) सामाजिक पाठबळ (अडचणीच्या काळात दिलेली व घेतलेली सामाजिक मदत) शिक्षण, कला, संस्कृती, पर्यावरण, शासन (पारदर्शी, सहभागी, भ्रष्टाचार मुक्त) वित्तीय सुरक्षा, मुलभूत गरजांची पूर्तता, कार्य किंवा रोजगार-वेतन समाधान अशा बाबींचा समावेश होतो. प्रत्यक्ष आनंद मापनासाठी नमुना निवड पद्धतीने लोकांची मते घेतली जातात यासाठी गेल्या 3 वर्षाचा संदर्भ कालखंड वापरला जातो. प्रत्येक प्रश्नास श्रेणीबद्ध प्रतिक्रिया किंवा उत्तर घेतले जाते व या आकडेवारीतून आनंदी निर्देशांक तयार होतो. याचा वापर केवळ विविध देशांच्या आनंदी स्तराची तुलना करण्यासाठी मर्यादित नसतो. विविध संशोधन, स्वायत्त संघटना, शासकीय धोरण निश्चितीस मार्गदर्शक म्हणून याचा वापर होऊ शकतो. सामाजिक परिवर्तनाचे, विषमता घटविणारे, नैसर्गिक साधनांचा सुयोग्य वापर करणारे व एकूण मानवी कल्याण वृद्धींगत करणारे साधन म्हणून आनंदी दर्शकांक उपयुक्त ठरतो.
भारतीय आनंदी नाहीत?
आनंदी निर्देशांकात अफगाणिस्तान शेवटच्या क्रमांकावर असून सर्वाधिक आनंदी राष्ट्र फिनलंड असून सतत सातव्यांदा हे स्थान टिकवून आहे. याचसोबत भारताची क्रमवारी 143 देशात 126 वी असून आपल्या तुलनेत शेजारचा नेपाळ 93, पाकिस्तान 108 तर चीन 60 व्या क्रमांकावर आहे. श्रीलंका 128 तर बांगला देश 129 व्या क्रमांकावर आहे. श्रीमंत व प्रगत राष्ट्रात अमेरिका 23 व्या तर जर्मनी 24 व्या क्रमांकावर आहे. युद्धग्रस्त राष्ट्र युव्रेन (105), पॅलेस्टीन (103)अशा क्रमांकावर असल्याने अशा देशातील लोक आनंदी व लोकसंख्येचा मोठा आकार, वेगवान प्रगती आणि पाचव्या क्रमांकावर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार असणारा ‘भारत’ आनंदात मागासलेला हे विसंगत वाटते. याबाबत पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव संन्याल यांनी आनंदी क्रमवारीत अन्यायपूर्वक भेदभाव झाल्याचे म्हटले आहे. अर्थात हे फक्त याच वर्षासाठी नाही तर भारताची क्रमवारी 2015 मध्ये 117, 2016 मध्ये 118, 2017 मध्ये 122, नंतर 2018-19-20 मध्ये अनुक्रमे 133, 140, 144 अशी घसरत गेली. एकूणच आपण केवळ आनंदी दर्शकात सातत्याने शतकपार तर आहोतच पण त्यापेक्षा त्यात सुधारणेऐवजी मागे जात आहोत हे नकारात्मक वैशिष्ट्या ठरते!
आनंदीपणा मोजण्यासाठी लोकसंस्थेतील तरुण, वृद्ध, स्त्रिया, सामाजिक स्थान (जात) शिक्षण यांचा संदर्भ घेण्यात आला असून याबाबत भारतासंबंधी असणारी निरीक्षणे महत्त्वाची आहेत. जागतिक स्तरावर तरुण अधिक आनंदी असल्याचे दिसले तर भारतात आनंदी गटात वृद्धांचे प्रमाण अधिक आहे! उच्च जातीतील, माध्यमिक शिक्षण असणारे हे निरक्षर, मागास जातीपेक्षा अधिक आनंदी होते. पुरुषापेक्षा स्त्रिया आनंदात पुढे होत्या. इंटरनेटच्या वापरासोबत व 1980 नंतर जन्मलेली जनरेशन एक्स ही सामाजिक संबंधाबाबत कमी आनंदी असल्याचे निदर्शनास आले आहे.
धोरणात्मक अन्वयार्थ
केवळ आर्थिक संपन्नता पुरेशी नाही तर त्यासोबत सामाजिक नाते संबंध, शिक्षण, आरोग्य, स्वच्छ प्रशासन याबाबी मानवी कल्याणाचे महत्त्वाचे घटक असतात. त्यावरच आनंदीपणा अवलंबून असतो हे अधोरेखित करण्याचे काम आनंदीदर्शक करतो. आनंदीपणा हे मापन पूर्णत: योग्य असल्याचा दावा यात नाही तसेच विशिष्ट देशाबाबत पूर्वग्रह ठेवून मापन होते, असेही म्हणता येणार नाही. जागतिक स्तरावर आध्यात्मिक विश्वगुरु असणारा भारत हा आनंदी का नाही याबाबत स्वतंत्र निकषांचा वापर करून अभ्यास करण्याची गरज या निमित्ताने स्पष्ट होते.
- प्रा. विजय ककडे