‘बजरंग बली की जय’च्या गजरात हनुमान जयंती साजरी
मंदिरांना विशेष आरास : मारुती गल्लीतील मारुती देवस्थानतर्फे रथोत्सव मिरवणूक : श्रीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा : विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप
मारुती गल्ली येथील मारुती मंदिर
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे जन्मोत्सव व त्यानंतर विविध विधी संपन्न झाले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे चार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी मारुती देवस्थानच्यावतीने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, अनंतशयन गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोडमार्गे मारुती मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली. श्रीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
मारुती देवस्थान, शहापूर
खडेबाजार, शहापूर येथील मारुती देवस्थानात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विशेष आरास करण्यात आली होती. अभिषेक तसेच इतर धार्मिक विधी करण्यात आले. भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार
हनुमान जयंतीनिमित्त संयुक्त महाराष्ट्र चौक खडेबाजार येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सवानिमित्त विशेष आरास करण्यात आली होती. संजय कलघटगी यांनी पौरोहित्य केले. भाविकांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.
कॅम्प येथील उभा मारुती
कॅम्प येथील उभा मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे विधिवत हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चार ते पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
स्वामी विवेकानंद चौक,समादेवी गल्ली
समादेवी गल्ली येथील स्वामी विवेकानंद चौक हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मारुतीच्या मूर्तीला विशेष आरास तसेच सजावट करण्यात आली होती. भाविकांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.
बाजार गल्ली, वडगाव
वडगाव, बाजार गल्ली येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त पहाटे मारुतीला कुंकुमार्चन करून जलाभिषेक व रुद्राभिषेक करून अलंकारांनी सजविण्यात आले. हभप वैजनाथ उच्चुकर यांनी रुईच्या पानांवर लिहिलेला हार घालून पुजारी युवराज भट व रामेश्वर भट यांनी मंत्रघोषात आरती व पूजा करण्यात आली. यावेळी हनुमानाचे पाळणा गीत म्हटले. यानंतर सर्वांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंदिराचे ट्रस्टी, महिला मंडळ, भाविक उपस्थित होते. सायंकाळी 4 वाजता वडगावमध्ये हनुमान पालखी दिंडी काढून रात्री 8 वाजता पालखी मंदिरात आल्यावर आरती करून सांगता करण्यात आली.
माळमारुती हनुमान मंदिर
बेळगाव परिसरातील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या माळमारुती येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत अभिषेक सेवा करण्यात आली. त्यानंतर हनुमान चालिसा पठण, पहाटे 6.14 वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. याबरोबरच खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील मारुती मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्प येथील भावसार क्षत्रिय पंच मंडळाच्या मारुती मंदिरात सुरेख आरास करण्यात आली होती. पोस्टमन सर्कल येथील पोस्ट कार्यालयात असणाऱ्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
लोकमान्य श्रीराम मंदिर
आचार्य गल्ली, गाडेमार्ग, शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात मंगळवारी सकाळी 6 वाजता हनुमान मूर्तीचे पूजन करून खासबाग-शहापूर महिला मंडळाच्यावतीने पाळणा व नंतर शहापूर वारकरी भजनी मंडळाच्यावतीने टाळ, मृदंगाच्या गजरात भजन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता जीवनविद्या मिशन शाखा बेळगाव आयोजित खासबाग उपकेंद्राच्यावतीने हरिपाठ तसेच प्रवचनकार मधुरा शिरोडकर यांचे प्रवचन झाले. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीचे संचालक सुबोध गावडे, पीआरओ राजू नाईक, सुधीर कालकुंद्रीकर, तानाजी पाटील, मोहन मेलगे, शेखर हंडे उपस्थित होते.
घुमटमाळ मारुती मंदिर
हिंदवाडी येथील पुरातन श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि 22 व 23 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. 22 रोजी रात्री 8 ते 9.30 या वेळेत वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला. दि. 23 रोजी पहाटे 4 वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, 5 ते 7 वाजेपर्यंत ह. भ. प. कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन, सूर्योदयास जन्मकाल व आरती, 7 ते 10 वाजेपर्यंत पवमान यज्ञ संपन्न झाला. या यज्ञात सहा जोडपी सहभागी झाली होती. यज्ञाचे पौरोहित्य सचिन जोशी भटजी व सहकाऱ्यांनी केले. दुपारी 12 नंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या निमित्ताने आज अनेक महनीय व्यक्तींनी मंदिरास भेट देऊन कार्यक्रमात सहभाग दर्शविला. भाजपाचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर, याचबरोबर नगरसेवक नितीन जाधव व मंगेश पवार, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल हेही सहभागी झाले होते. घुमटमाळ मारुती मंदिराच्या ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, उपाध्यक्ष कुलदीप भेकणे, सेक्रेटरी प्रकाश माहेश्वरी यांच्यासह सर्व संचालकांनी उपस्थित राहून उपस्थितांचे स्वागत केले व प्रसादाचे वाटप केले. या महाप्रसादासाठी अनेक व्यक्तींनी सढळ हस्ते देणग्या दिल्या.