विविध कार्यक्रमांनी तालुक्यात हनुमान जयंती साजरी
हनुमान मंदिरांत विशेष पूजा : हनुमान जन्मोत्सव थाटात : दर्शनासाठी भक्तांची गर्दी, ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप : भजन, कीर्तन कार्यक्रम
वार्ताहर /किणये
पवनपुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय, असा जयघोष करत तालुक्मयात मंगळवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावांमध्ये असलेल्या हनुमान व मारुतीच्या मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये हनुमान मंदिरे आहेत. हनुमान जयंतीनिमित्त या मंदिरांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच फुला हारांनी मंदिरांना सजविण्यात आले होते. मंदिर परिसरात आंब्याच्या व केळीची झाडे बांधण्यात आली होती. मंगळवारी पहाटेपासूनच हनुमान जयंतीच्या सोहळ्याला गावांमध्ये प्रारंभ झाला. बऱ्याच ठिकाणी पहाटे काकड आरती करण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिरात मूर्तीची विधिवत पूजा, अभिषेक आदी कार्यक्रम झाले. अनेक ठिकाणी महिलांनी पाळणागीत म्हटले व हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी बऱ्याच ठिकाणी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर काही गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बहाद्दरवाडी
बहाद्दरवाडी गावातील ब्रम्हलिंग मंदिरासमोर मारुतीचे मंदिर आहे. या ठिकाणी मंगळवारी सकाळी पूजा करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर पाळणागीत म्हणण्यात आले. उपस्थित सर्व भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
कर्लेत हुनमान जयंती
कर्ले गावच्या वेशीजवळ हनुमान मंदिर असून या मंदिराला हनुमान जयंतीनिमित्त आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात दिवसभर गावातील विविध भजनी मंडळांनी भजने सादर केली. उपस्थित भाविक व गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कर्लेसह परिसरातील भक्तांनी याचा लाभ घेतला.
नावगे क्रॉस, संतिबस्तवाड
नावगे क्रॉस, संतिबस्तवाड येथील पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. अभिषेक पूजा व जन्मोत्सव सोहळा पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पिरनवाडी-जांबोटी या रस्त्याच्या बाजूलाच नावगे क्रॉसजवळ हे पंचमुखी मंदिर असल्यामुळे या ठिकाणी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
पिरनवाडी
पिरनवाडी येथील सिद्धेश्वरनगर मारुती गल्ली, माऊती मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. पूजा, अभिषेक करण्यात आला. तसेच जनता प्लॉट पाटील गल्ली पिरनवाडी येथील मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. या दोन्ही ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर किणये, मच्छे, वाघवडे, संतिबस्तवाड, झाडशहापूर, हुंचेनट्टी, बामणवाडी, बाळगमट्टी, नावगे, कावळेवाडी जानेवाडी, बिजगर्णी, बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, येळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडास, हलगा, बस्तवाड, खादरवाडी, हंगरगा, मंडोळी, सावगाव आदी गावांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावांमध्ये मंगळवारी रात्री कीर्तन निऊपणाचे कार्यक्रम झाले.
बाळेकुंद्री परिसर
बाळेकुंद्री खुर्द व परिसरातील पंत बाळेपुंद्री, मोदगा, सुळेभावी, मारिहाळ, हुदली भागात मंगळवारी हनुमान जन्मोत्सवनिमित्त मंदिरात अभिषेक, हनुमान स्त्राsत पठण, पूजा, पाळणा, आरती, मंगलाआरती भजन व महाप्रसाद सोहळा भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. पंत बाळेकुंद्री येथील होनिहाळ गावच्या वळणाजवळ असलेल्या दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात (गोसावी मठ), बाळेकुंद्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. रात्रभर जागर भजन झाले. पहाटे मूर्तीला अभिषेक, त्यानंतर जन्मोत्सव झाला. सकाळी साडेनऊ वाजता सत्यनारायणची पूजा व दुपारी 12 वाजता महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली. बाळेकुंद्री खुर्द हनुमान मंदिरातही हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
बाळेकुंद्री खुर्द येथे श्री कलमेश्वर रथोत्सव, हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात
बाळेकुंद्री खुर्द येथे सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीला होणाऱ्या श्री कलमेश्वर यात्रेला मंगळवारी रथोत्सवाने उत्साहात प्रारंभ झाला. तर माऊती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळाही उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी पहाटे मंदिरात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर रथाची विधिवत पूजा करण्यात आली व ग्रामस्थांकडून रथ ओढून रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. दिवसभरात श्री कलमेश्वर देवाच्या दर्शनासाठी व रथाला श्रीफळ वाढविण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. येथील श्री मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी मंदिरात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पाळणा म्हणण्यात आला व भक्तांना पंचामृत व सुंठवडा वाटण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज आंबिल गाड्यांची मिरवणूक
बुधवार दि. 24 रोजी सायंकाळी आंबिल गाडे होणार आहेत. आंबिल गाड्यांची मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येणार असून यावेळी आंबिल व घुगऱ्या वाटण्यात येणार आहेत. तर रात्री सजविलेल्या मकरच्या गाड्यांची मिरवणूक निघणार आहे. गुऊवारीही दिवसभर सजविलेल्या बैलजोड्यासह मकरच्या गाड्यांची संपूर्ण गावांमध्ये मिरवणूक काढण्यात येईल व रात्री यात्रेची सांगता होणार आहे.