शहर परिसरात हनुमान जयंती उत्साहात
विविध धार्मिक कार्यक्रम : दर्शनासाठी भाविकांची गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात शनिवारी हनुमान जयंती उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पूजा-अर्चा, अभिषेक, जन्मोत्सव सोहळा, पाळणा, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तांनी मारुती मंदिरे फुलून गेली होती. सकाळपासून दर्शनाबरोबर महाप्रसादासाठीही गर्दी झाली होती. ‘पवनपुत्र हनुमान की जय, संकट मोचन रामभक्त हनुमान की जय’ असा जयघोष घुमला.
नेहरूनगर हनुमान मंदिर
नेहरूनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. पूजा-अर्चा झाल्यानंतर महिलांनी पाळणा गायिला. यावेळी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
माळमारुती येथील मारुती मंदिर
माळमारुती येथील मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. याबरोबरच मंदिराला फुले-हारांनी सजविण्यात आले होते.
मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मारुती मंदिर
मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज येथील मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी पूजा-अर्चा आणि जन्मोत्सव सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
बाजार गल्ली, वडगाव दक्षिणमुखी हनुमान मंदिर
बाजार गल्ली, वडगाव दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी लोककल्याणासाठी शनि पीडा, आरोग्य पीडा, शत्रू पीडा व देशकल्याणासाठी वायुस्तुती होम करण्यात आला. पौरोहित्य उमेश भटजी, वनूज भटजी यांनी केले. याबरोबरच पहाटे 5 वाजता जलाभिषेक, पंचाभिषेक, कुंकुमार्चन करण्यात आला. यावेळी आरती करण्यात आली. त्यानंतर पाळणा गीत व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भक्तांनी घेतला. मंदिराचे ट्रस्टी यावेळी उपस्थित होते.
रघुनाथ पेठ, अनगोळ येथील मारुती मंदिर
रघुनाथ पेठ, अनगोळ येथील मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त मूर्तीवर आकर्षक आरास करण्यात आली होती. त्याबरोबरच सकाळी विविध पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी करण्यात आले.
लोकमान्य श्रीराम मंदिर
आचार्य गल्ली, गाडेमार्ग, शहापूर येथील पुरातन लोकमान्य श्रीराम मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. भटजी चिदंबर ग्रामोपाध्ये यांनी हनुमानाच्या मूर्तीचे पूजन केले. रेखा जाधव यांनी हनुमानाचा पाळणा म्हणून स्तोत्र सादर केले. दर्शन घेण्यासाठी शहापूर परिसरातील हनुमान भक्त उपस्थित होते.
रविवार दि. 13 रोजी सायंकाळी 5 वाजता जीवनविद्या मिशनचे प्रवचनकार मृणाल खनगावकर यांचे हनुमान जन्मोत्सव या विषयावर प्रवचन होणार आहे. शनिवारी झालेल्या कार्यक्रमाला संध्या कालकुंद्रीकर, दीपा भेकणे, रेणुका मेलगे, आशाताई गिणगिणे, गुणवंती मेलगे, कल्याणी कालकुंद्रीकर, स्वाती हलगेकर, मालू धामणेकर, संगीता पाटील, माधुरी भेकणे, लोकमान्य सोसायटीचे संचालक सुबोध गावडे, सुधीर कालकुंद्रीकर, राजेश हंडे, रवी शिगेहळ्ळीकर उपस्थित होते.
पांगुळ गल्ली अश्वत्थामा मंदिर
हनुमान जयंतीनिमित्त पांगुळ गल्ली अश्वत्थामा मंदिर येथील मारुती मंदिरात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारुतीला दही, दूध, तूप व फळांचा अभिषेक करण्यात आला. यानंतर मारुती देवाला पाळण्यामध्ये घालून महिलांनी पाळणा गायिला. यावेळी पुजारी आनंद भातकांडे, मल्हारी कुऱ्हाडे, अरुण मुतकेकर, किरण कावळे, नितीन भातकांडे, अनंत कुचेकर, मिथुन कुऱ्हाडे, संजय भातकांडे यासह इतर उपस्थित होते.
स्वयंभू गणेश मंदिर, टिळकवाडी
स्वयंभू गणेश मंदिर, टिळकवाडी येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 6 वाजता महाभिषेक व पाळणा उपस्थित सर्व भक्तांनी म्हटला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. सर्व भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दामोदर भोसले, मारुती कदम, कृष्णा गवळी, राजू जाधव, रमेश गवळी, देशपांडे भटजी आदी उपस्थित होते.
घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव
हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री वारकरी संप्रदाय भजनी मंडळाचे भजन झाले. शनिवारी पहाटे हनुमान मूर्तीवर शेकडो भक्तांकडून अभिषेक झाल्यानंतर पहाटे 5 पासून हभप कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर कीर्तन झाले. ठीक 6.25 वाजता हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा अनेक भक्तांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर महिलांच्या भजनाचे कार्यक्रम झाले. घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीच्यावतीने स्वागत करण्यात आले. दुपारी झालेल्या महाप्रसादाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला. महाप्रसादाचे पूजन हिंदवाडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रेमजी पटेल व जय रमेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटी अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, उपाध्यक्ष कुलदीप भेकणे, सचिव प्रकाश माहेश्वरी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.