हंसीका लांबा उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / नोव्ही साद (सर्बिया)
23 वर्षांखालील वयोगटातील येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची मल्ल हंसीका लांबाने 53 किलो वजन गटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. तर भारताची आणखी एक मल्ल नेहा शर्माने 57 किलो वजन गटात कांस्यपदक लढतीमध्ये प्रवेश मिळविला आहे.
या स्पर्धेत गुरूवारी भारताच्या प्रिया मलिकने भारताला दुसरे पदक मिळवून दिले होते. तिने मेक्सीकोच्या व्हिलालबाचा 8-1 असा पराभव करत कांस्यपदक मिळविले. भारताच्या निशुने 55 किलो गटात तसेच पुलकीतने 65 किलो गटात, सृष्टीने 68 किलो गटात कांस्यपदकासाठीच्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. महिलांच्या 53 किलो वजन गटात हंसीका लांबाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उझबेकच्या मॅटेन्झेरोव्हाचा 10-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. या वजन गटात हंसीकाने पहिल्या लढतीत व्हिक्टोरिया व्हॉलचा 11-0 तर त्यानंतरच्या दुसऱ्या लढतीत कझाकस्तानच्या बायानोव्हाचा 8-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत भारताच्या हनी कुमारी आणि दिक्षा मलिक यांचे आव्हान संपुष्टात आले. आता या स्पर्धेत पुरूषांच्या फ्रीस्टाईल लढतींना शुक्रवारपासून प्रारंभ झाला आणि भारताच्या परविंदरला 74 किलो गटात तसेच सचिनला 92 किलो गटात पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.