लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या शेतकऱ्यांना धोकादायक
काकती शिवारातील प्रकार : तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : शिवारांमधील वीजवाहिन्या लोंबकळत असून विद्युतखांब कलंडले असल्याचे चित्र बेळगाव तालुक्यात सर्रास नजरेत पडत आहेत. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शिवारांमध्ये वीजेचा धक्का लागून अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्याच्या दिवसात दुरूस्ती करणे अशक्य असते. परंतु किमान सध्या तरी दुरूस्ती करून जीवघेणे वीजखांब दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
काकती शिवारात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या लोंबकळत आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करून देखील हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ काकतीच नाही तर तालुक्याच्या इतर भागातही शिवारांमध्ये वीजेचे खांब केव्हा कोसळतील याचीं शाश्वती नाही. यापूर्वी बेळगुंदी, अनगोळ, जुनेबेळगाव या ठिकाणी वीज वाहिन्या तुटून शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत.
पावसाळ्यात शिवारामध्ये दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे उत्तर
हेस्कॉम कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते. परंतु पिकाची कापणी, मळणी झाल्यानंतर तरी वीज वाहिन्या व खांबांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. थातुरमाथुर उत्तरे देत दुरुस्तीचे काम प्रलंबित ठेवले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. एखादा निष्पाप शेतकऱ्यांचा जीव जाण्यापूर्वी दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली जात आहे.
शेतकरीही तितकेच जबाबदार
शिवारातील विजेचे खांब कलंडण्यामध्ये शेतकरीही तितकेच जबाबदार आहेत. वीज खांबांसाठी लावलेली तार आपल्या शेतात नको म्हणून काढून टाकली जाते. तसेच काही ठिकाणी वीज खांबाजवळची माती उकरण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे विजेचे खांब कलंडत असून वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचे भान राखणे गरजचे आहे.