For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहकार क्षेत्रातील हात रमलेत मोरांच्या पालनपोषणात

01:58 PM Feb 27, 2025 IST | Radhika Patil
सहकार क्षेत्रातील हात रमलेत मोरांच्या पालनपोषणात
Advertisement

दापोली / मनोज पवार : 

Advertisement

जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपल्या सहकार ज्ञानाची मोहर उमटवणाऱ्या दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर यांना मोरांचा लळा लागला आहे. आपल्या घराजवळील टेकडीवर ते दररोज मोरांना खायला घालतात व ते खाद्य खाण्यासाठी जंगलातून सुमारे 7 ते 8 मोर दररोज त्यांच्या घराजवळ हजेरी लावतात. हा नजारा पाहण्यासाठी अनेकजण सकाळी त्यांच्या घरी गर्दी करतात.

मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. मोराचे अन्न हे झाडाची पाने, कीडे, साप, सरडे, अळी आहे. ते काही फळेही खातात. मोर पानझडी जंगल व अरण्यात राहतात व ते रात्री आसऱ्यासाठी झाडांवर जातात. मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात. ते प्रामुख्याने मोकळ्dया जंगलात किंवा शेतात आढळतात. जेथे त्यांना खाद्य मिळते. पावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो व नाचतो, असा समज आहे. मात्र तो मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवतो, असा अभ्यासकांचा होरा आहे.

Advertisement

डॉ.जयवंत जालगावकर यांचे घर दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे आहे. त्यांच्या घरालगत एक छोटी टेकडी आहे. या टेकडीवर ते दररोज पहाटे मुबलक प्रमाणात धान्य नेऊन ठेवतात. शिवाय मोरांना पिण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणीही ठेवतात. सूर्योदय झाल्यावर त्यांच्या घराजवळील जंगलातून मोर दररोज न चुकता तेथे येतात व डॉ. जयवंत जालगावकर यांनी ठेवलेल्या धान्यावर ताव मारतात.

डॉ. जालगावकर यांना मोरांचा लळा सुमारे 3 वर्षांपासून लागला आहे. गेली 3 वर्षे ते दररोज जंगलातील मोरांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करत आहेत. त्यांच्या घराजवळ दररोज सुमारे 7 ते 8 मोर झुंडीने येतात. त्यांची आपापसात चालणारी कुजबूज, आपापसात चालणारा दंगा जालगावकर दररोज पाहतात. राष्ट्रीय पक्षी मोरांच्या दर्शनाने आपल्याला खूप आनंद मिळतो, असेही डॉ.जालगावकर सांगतात.

या मोरांना पाहण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी सकाळी येत असतात. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत या मोरांना खायला घालू, असेही त्यांनी ‘तऊण भारत संवाद’शी बोलताना सांगितले. डॉ. जालगावकर बँकेच्या कामासाठी दापोलीच्या बाहेर जायचे असेल तर ते पहाटे उठून सर्वात आधी मोरांच्या खाण्याची व्यवस्था करतात. नंतर ते आपल्या इच्छितस्थळी जातात

Advertisement
Tags :

.