प्रकरण सीबीआयकडे द्या!
हडफडे गोवा येथील बर्च बाय रोमिओ लेन जळीत हत्याकांड प्रकरणात 25 जणांचा बळी गेल्यानंतर त्यातील मुख्य आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा हे भारतातून थायलँड आणि तिथून दुबईला पोहोचल्याचे वृत्त राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी लावून धरलेले आहे. गोव्याची या संपूर्ण प्रकरणाने प्रचंड बदनामी झालेली आहे. या लुथरा बंधूंचे हणजूण, वागातोर आणि हडफडे येथे मिळून तीन नाईट क्लब याशिवाय आणि बरेच काही धंदे गोव्यात आहेत. या मंडळींचे सर्वच व्यवहार हे अत्यंत बेकायदेशीर असून त्यांना राजकीय संरक्षण मिळाल्याशिवाय ते हे धंदे करू शकत नाहीत. मुळात पंचायत संचालकांना आणि हडफडे ग्रामपंचायतीच्या सचिवांना निलंबित केल्यानंतर यांना आदेश देणारा नेमका राजकीय नेता कोण! याची देखील चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण गोवा भ्रष्टाचारामध्ये बुडाला आहे हेच खरे. या प्रकरणात संबंधित राजकीय नेत्यांची पाळे-मुळे नेमकी कुठपर्यंत पोहचलेली आहेत हे कळण्यास मार्ग नाही. अनेक प्रकरणे बाहेर येतात आणि नंतर ती गायब होतात, हडफडे येथे जळीत हत्याकांड झाले या प्रकरणाची चौकशी खरे तर गोव्याबाहेरील अधिकाऱ्यांमार्फत होणे आवश्यक आहे. जनतेचा जसा सरकारवरील विश्वास उडालेला आहे तसा प्रशासनावरचादेखील विश्वास उडालेला आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांवरचादेखील विश्वास उडाला आहे. मंत्री, आमदार तोंडी आदेश देतात, त्याची अंमलबजावणी अधिकारी करतात. कुठेतरी देवाण-घेवाण झाल्याशिवाय बेकायदेशीर क्लबसारखे प्रकल्प गोव्यात बिनधास्तपणे चालू शकत नाहीत. गोव्यातील माध्यमांनी जळीत हत्याकांड प्रकरण लावून धरल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील सर्व वृत्तवाहिन्यांनी गोव्यात कसा भ्रष्टाचार चालतो याची रसभरीत उदाहरणे दिली, अनेकांच्या मुलाखती देखील घेतल्या. गोव्यातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराला नेहमीच खतपाणी घातले. त्यामुळेच किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभी राहिलेली आहेत. ‘बर्च’ नाईट क्लब प्रकरण हे याचा एक धडधडीत नमुना म्हणावे लागेल. रात्री बारा वाजता आग लागली आणि हा हा म्हणता एक दीड वाजेपर्यंत अनेक मृतदेह अग्निशामक दलाच्या कर्मचारीवर्गाने बाहेर देखील काढले. गोव्यामध्ये आजपर्यंतची ही सर्वात मोठी आगीची दुर्घटना म्हणावी लागेल. बर्च बाय रोमिओ लेनची वास्तू तयार झाली तीच मुळी पूर्णत: बेकायदेशीर आहे. तिला स्थानिक पंचायतीने अगोदर परवानगी दिली, खरे म्हणजे तो व्यापार परवाना होता. मात्र इमारत पूर्णत: बेकायदेशीर उभारली होती, त्याकडे का डोळेझाक केली? आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे सात ते आठ सरकारी खात्यांचे आवश्यक परवाने देखील या बर्च नाईट क्लबकडे कसे पटापट पोहचतात हेच कळत नाही. मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या पर्यावरण खात्याचा परवाना देखील या क्लबला मिळतो, यापेक्षा दुर्दैवाची बाब दुसरी असूच शकत नाही. स्थानिक पंचायतीने जेव्हा हा क्लब मिठागरात बेकादेशीर बांधल्याचे कारण दर्शवून तो पाडण्यासाठीचा आदेश जारी केला, त्यानंतर गौरव आणि सौरव या लुथरा बंधूंनी पंचायत खात्याकडून स्थगिती देखील प्राप्त केली. हा सारा प्रकारच संशयास्पद वाटतो. पंचायत संचालकांना नेमके कोणत्या मंत्र्याने लुथरा बंधूंच्या या बेकायदेशीर नाईट क्लबला परवानगी देण्याचे तोंडी आदेश दिले असतील त्या मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे. या क्लबला आग लागल्यानंतर व त्यात 25 माणसे ठार झाली ही बातमी आली, तेव्हा दोन्ही लुथरा बंधू इंडिगोच्या विमानातून पाच तासांच्या आत देश ओलांडून जातात हे त्याहीपेक्षा मोठे आश्चर्य आहे. संपूर्ण देशभरात इंडिगोची विमानसेवा ठप्प झालेली आहे आणि थायलँडला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची सेवा त्यांची चालू राहते व त्यातून लुथरा बंधू पोबारा करतात. त्यांना तातडीने विमानाची तिकिटे देखील पहाटे प्राप्त होतात, हे सारे संशयाला खतपाणी घालणारे आहे. मंगळवारी पर्यटन खात्याने वागातोर येथील लुथरा बंधूंच्या एका हॉटेलचा काही भाग पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर केला. मात्र बुलडोझरने त्यांचे हॉटेल पाडले जाईल अशा पद्धतीचा संदेश संपूर्ण देशभर गेला. प्रत्यक्षात मात्र केवळ 195 मीटरचाच भाग तो देखील समुद्रकिनाऱ्यावर बांधलेला होता तो चौथ्यांदा पाडला. या अगोदर जुलैमध्ये पर्यटन खात्याने कारवाई करून तो भाग पाडला होता. त्यानंतर या दोन्ही बंधूंनी पुन्हा एकदा भाग पुन्हा बांधून काढला आणि गेली पाच महिने हे बेकादेशीर बांधकाम उभे होते. त्या विऊद्ध पर्यटन खात्याने कारवाई कशासाठी केली नाही! या लुथरा बंधूंच्या पाठीमागे नेमके कोण आहेत हे गोव्यातील जनतेला देखील कळू द्या. लुथरा बंधूंच्या गोव्यातील कारवायांकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष अक्षम्य आहे. पोलीस यंत्रणादेखील त्यांना सामील झालेली होती, अशा पद्धतीची निवेदने आता हडफडे, वागातोर इत्यादी भागातून नागरिक करू लागले आहेत. याचाच अर्थ कोणीतरी राजकीय गॉडफादर असल्याशिवाय या दिल्लीतील धनदांडग्यांची दादागिरी गोव्यात झाली नसती. यासाठीच हे प्रकरण स्थानिक पोलिसांच्या हाती न देता त्यासाठी सीबीआयचा वापर निश्चित झाला पाहिजे. कारण स्थानिक पातळीवर एकमेकांना सांभाळण्याचे काम केले जाईल आणि यातील जे मुख्य आरोपी आहेत ते मोकाट सुटतील. लुथरा बंधूंना गोव्यात नेमके कोण कोण मदत करीत होते, याची नावे देखील आता उघड होणे आवश्यक आहे. प्रकरणाची गांभीर्यता ओळखून केंद्र सरकारने या संपूर्ण घटनेमध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे. गोवा पोलिसांवर विश्वास नाही अशातला भाग नाही परंतु गोवा पोलीस हे राजकीय नेत्यांच्या दबावाखाली पारदर्शकपणे, निपक्षपातीपणे या साऱ्या प्रकरणाची चौकशी करू शकणार नाहीत. आरोपी केवळ लुथरा बंधूच आहेत असे नाही, तर त्याहीपेक्षा अनेकजण आहेत आणि त्यांचे बुरखे फाडण्याची हीच वेळ आलेली आहे. बेकायदेशीर बांधकाम करून देखील त्या नाईट क्लबला आवश्यक असलेले सर्व परवाने मिळतात आणि एखादे बेकायदेशीर घर असेल तर ते कायदेशीर करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा जीव मेटाकुटीला येतो कारण त्याला लुटण्यासाठी पंचापासून, पंचायत सचिव, मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक अधिकारी टपून बसलेले असतात. गोव्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला म्हणूनच हे जळीत हत्याकांड, हा त्याचा परिपाक आहे. झोपी गेलेल्या व्यक्तीला जागे करता येते झोपेचे सोंग घेऊन राहणाऱ्यांना जागे करता येत नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2022 मध्ये पुन्हा सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर गोव्यातून भ्रष्टाचाराचे पूर्णत: उच्चाटन होईल, असे जाहीर केले होते. त्यांचे आश्वासन हवेत विरले गेले, हडफडे येथील प्रकरणाने भ्रष्टाचाराचा ज्वालामुखीच उघडा पाडला.