देवा, माझ्या मनातील भ्रम दूर करण्यासाठी आता उशीर करू नका
अध्याय तिसरा
दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आत्मज्ञान आणि बुद्धियोग ह्याबद्दलची माहिती अर्जुनाने ऐकली पण त्याच्या मनाचे समाधान झालेले नव्हते, म्हणून त्याने भगवंताना विचारले, कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे तुमचे मत आहे, तर मग माझी बुद्धी युद्ध करू नकोस असे मला सांगते आहे. वास्तविक पाहता भगवंतांनी नुसते बुद्धी न म्हणता समबुद्धी असा शब्द वापरला होता परंतु अर्जुनाने समबुद्धी ऐवजी नुसताच बुद्धी हा शब्द घेतला.
तो पुढे म्हणाला, आपल्या ह्या घोटाळ्यात टाकणाऱ्या, दुट्टपी वचनामुळे माझ्या बुद्धीला भ्रम झाला आहे. तरी जे केल्याने माझे हित होईल असे एक निश्चित काय ते सांगा. ह्या अर्थाचा
मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी । ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ।।2।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार अर्जुनाने पुढे विचारले, देवा! तुम्हीच जर असे संदेह उत्पन्न होणारे विचार बोलू लागलात, तर आमच्यासारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे? मला आधीच काही समजेनासे झाले आहे, त्यात मी या मोहाच्या चक्रात अडकलो आहे, म्हणून हे कृष्णा! खरे काय आणि खोटे काय, हे तुला विचारत आहे.
अर्जुनाच्या अशा उपरोधिक बोलण्याचे आपल्याला आश्चर्य वाटते. भगवंत त्याच्या कल्याणाचे सांगत असताना हा असा उद्धटपणाने देवांशी का बोलतो आहे असेही मनात येते. त्यावर खुलासा असा की, अर्जुन आणि भगवंत हे गुरुशिष्य खरे पण अर्जुन भगवंतांची सख्यभक्ती करत असे. भागवतात सांगितलेल्या भक्तीच्या नऊ प्रकारात सख्यभक्ती हा एक प्रकार आहे. सख्यभक्तीमध्ये भगवंताशी कोणताही आडपडदा न ठेवता मनातील सर्व जसेच्या तसे बोलायचे असते आणि अशा प्रकारचे बोलणे फक्त घनिष्ठ मित्राशीच होऊ शकते. त्यामुळे येथे, हे लक्षात घ्यावे लागेल की, हे बोलणे दोन मित्रातील आहे. दोन घनिष्ठ मित्रांच्यात एकमेकाशी वाद घालणे, तू काय सांगतोयस, माझेच बरोबर आहे अशा पद्धतीचे बोलणे नेहमीच होत असते. त्याप्रमाणे मित्राशी मनमोकळेपणे बोलावे, प्रसंगी त्याला हिणवावे अशा पद्धतीने अर्जुनाचे भगवंताशी नेहमीच बोलणे होत असे पण आपण जरा जास्तच बोललो असे वाटून अर्जुन चपापला आणि स्वर बदलून म्हणाला, हे श्रीकृष्णा! कदाचित या उपदेशाच्या निमित्ताने तुम्ही माझी परीक्षा घेत असाल, म्हणून देवा! आपण माझे ऐकावे. हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नका. महाराज, तो विचार मला समजेल असा सोपा करून सांगा. मी अतिशय मंदबुद्धी आहे. आपल्या बोलण्याला उदाहरण म्हणून अर्जुन पुढे म्हणतो, रोग नाहिसा होण्यासाठी वैद्याने औषध तर द्यावे परंतु ते मधुर व रुचकर असावे आणि रोग्याने ते आनंदाने प्यावे, त्याप्रमाणे अर्थाने परिपूर्ण व आचरणास उचित योग्य असे तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की, जेणेकरून माझ्या मनाला नि:संशय कळेल आणि त्याप्रमाणे मला करता येईल.अर्जुन पुढे म्हणाला, देवा, तुमच्यासारखा सद्गुरू मला लाभला आहे, तर माझी इच्छा कृपया तृप्त करा. तू आम्हाला आईप्रमाणे आहेस तर मग भीड का धरावी? चिंतामणी जर हाती लागला, तर आपल्याला पाहिजे ते मिळतेच मग इच्छित वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपणास हवी तशी इच्छा का करू नये? अमृताच्या सागराजवळ यावे आणि अमृताचे प्राशन न करता तहानेने व्याकुळ व्हावे, त्याप्रमाणे हे कमलापती! तुमची जन्मोजन्मी मनोभावे उपासना केली, त्यामुळे आज दैवयोगाने तुम्ही आम्हाला लाभले आहात. माझ्या मनातील भ्रम दूर करण्यासाठी आता काळवेळ बघू नका.
क्रमश: