हाताचे इशारे आणि अर्थ
हातांच्या विशिष्ट हालचाली करुन दुसऱ्याला संदेश देण्याची प्रथा पूर्वापारपासून आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण असे अनेक प्रकारचे इशारे करत असतो. ज्याला हा इशारा केला जातो, त्याला त्याचा अर्थ नेमका कळतो आणि शब्दांवाचून योग्य तो संदेश त्याच्यापर्यंत पोहचतो. तथापि, येथे एका बाबतीत मोठी दक्षता घ्यावी लागते. अन्यथा अर्थाचा अनर्थ होण्याची स्थिती उत्पन्न होते. कारण आपण हाताने किंवा हाताच्या बोटांनी नेहमी करतो, त्या खाणाखुणांचे भिन्न भिन्न देशांमध्ये भिन्न अर्थ होतात. त्यामुळे अशा खाणाखुणा करताना आपण कोणत्या स्थानी आहोत, हे लक्षात घ्यावे लागते. नाहीतर आफत येण्याची शक्यता असते.
आपण दोन्ही हातांचे अंगठे उंचावून ‘थंब्ज अप’ चा इशारा करतो तेव्हा भारतात त्याचा अर्थ कामगिरी पूर्ण झाली असा होतो. मात्र, रशिया. इटली, नायजेरिया, ग्रीस आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये या खुणेचा अर्थ ‘अपमानजनक’ असा भलताच होतो. तेव्हा या देशांमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते.
उजव्या हाताची अंगठ्याजवळची दोन बोटे इंग्रजी व्हीच्या आकारात उंचावल्यास ते विजयाचे चिन्ह मानले जाते. ही खूण दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे यशस्वी नेतृत्व केलेले विन्स्टन चर्चिल यांच्यामुळे जगभरात लोकप्रिय झाली. तथापि, ती खूण करत असताना आपल्या हाताचा दर्शनी भाग बाहेर लोकांना दिसण्यासारखा असला पाहिजे. हाताची समोरची बाजू आपल्याकडे ठेवून ही खूण केल्यास तिचा अर्थ बेअब्रू किंवा बेइज्जती असा आहे, हे या देशांमध्ये लक्षात ठेवावे लागेल.
हाताचा अंगठा आणि त्याच्या जवळचे बोट एकमेकांना जोडून आपण जी ‘सुंदर’ किंवा ‘छान’ अशा अर्थाची खूण करतो ती खूण फ्रान्स, जर्मनी आणि ब्राझील या देशांमध्ये अत्यंत अपमानास्पद मानली जाते. या खुणेचा अर्थ या देशांमध्ये शिवी किंवा अश्लीलता असाही घेतला जातो. त्यामुळे तेथे सावधानता आवश्यक आहे.
आपल्याकडे आशीर्वाद देण्यासाठी किंवा सारे काही क्षेम आहे असे दर्शविण्यासाठी हाताचा पंजा दाखविला जातो. तथापि, या खुणेचा अर्थ ग्रीस आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये उलटाच घेतला जातो. अशी खूण एकाद्याला दाखविणे म्हणजे त्याचा अपमान करणे, असे मानले जाते. त्यामुळे दक्षता घ्यावी लागते. थोडक्यात सांगायचे, तर आपण ज्या देशात आहोत. तेथे आपल्या खुणांचे अर्थ काय होतात, याची आधी माहिती घेणे आवश्यक असते. अन्यथा गोंधळ निर्माण होऊ शकतो.