सातेरी देवीच्या वार्षिकोत्सवासाठी हणकोण सज्ज
उत्सवाला आज रात्री 12 वाजल्यापासून प्रारंभ : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह महाप्रसाद : 28 रोजी सांगता
कारवार : श्री सातेरी देवीच्या नव्याच्या वार्षिकोत्सवासाठी कारवार तालुक्यातील हणकोण हे गाव सज्ज झाले आहे. देवीच्या सात दिवशीय उत्सवाची सुरूवात शुक्रवारी (दि. 22) रात्री 12 वाजता होणार असून सांगता 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा वैशिष्ट्यापूर्ण उत्सव उद्यावर येऊन ठेपल्याने हणकोणवासियासह परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. उत्सव यशस्वी आणि नीटनेटका करण्यासाठी देवस्थानाशी संबंधित प्रत्येकजण कामाला लागला आहेत. श्री सातेरी देवस्थानासह अन्य देवतांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था देवस्थानाकडून करण्यात आली आहे.
चाकरमानी गावात दाखल
नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने अन्यत्र असलेले भाविक मूळ गावी दाखल झाले आहेत. परंपरेनुसार शनिवार दि. 23 रोजी रात्री देवीला ‘नवे’ अर्पण करून उत्सवाला सुरूवात होणार आहे. 24 तारीख कुळांच्या कुटुंबीयासाठी राखीव ठेवली आहे. त्यादिवशी ‘अडेकी’ आणि ‘तळई’ देण्याचा सोहळा होणार आहे. 25 तारखेपासून मंदिर सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. 22 रोजी मध्यरात्री उघडण्यात आलेला मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा 28 रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद केल्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.