हनुमाननगरात दोन घरांवर मनपाचा हातोडा
बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका : वीज-पाणी जोडणी, ड्रेनेज लाईनदेखील तोडली
बेळगाव : बांधकाम परवान्याचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या दोन घरांवर महानगरपालिकेच्यावतीने हातोडा फिरविण्यात आला आहे. हनुमाननगर येथे ही कारवाई करण्यात आली असून एका घराचे स्टेरकेस (जिना) आणि टॉयलेट, तर दुसऱ्या घराचा रॅम्प हटविण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्युत कनेक्शन, पाणी आणि ड्रेनेज लाईनदेखील तोडण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून घरांचे बांधकाम केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. हनुमाननगर येथील प्रदीप वामनराव अथणीकर यांनी सीटीएस नं. 4069 मधील प्लॉट नं. 506 मध्ये घर बांधले आहे.
मात्र टॉयलेट आणि स्टेरकेस सेटबॅकमध्ये बांधण्यात आला आहे, अशी तक्रार शेजारी रायबागकर यांनी महापालिकेकडे केली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी मनपा आयुक्तांच्या न्यायालयात सुरू होती. त्याठिकाणी सुनावणी होऊन घर मालक अथणीकर यांना कागदपत्रे सादर करता न आल्याने 17 ऑक्टोबर 2022 मध्ये महापालिका आयुक्तांनी सेटबॅकमध्ये बांधण्यात आलेले स्टेरकेस आणि टॉयलेट पाडण्याचा आदेश बजावला होता. या आदेशाच्या विरोधात अथणीकर यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती.
त्याठिकाणीदेखील आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने एप्रिल 2024 मध्ये मनपा आयुक्तांचा आदेश कायम ठेवत न्यायालयात दाखल केलेला खटला रद्दबातल ठरविला. न्यायालयाने 2024 मध्ये आदेश देऊनदेखील त्याची महापालिकेकडून अंमलबजावणी होत नसल्याने तक्रारदार रायबागकर यांनी नागरी हक्क निर्देशनालयाकडे तक्रार केली होती. महापालिकेने आपल्या घराचा रॅम्प हटविला आहे, मात्र न्यायालयाचा आदेश असूनही अथणीकर यांच्या घरचा स्टेरकेस आणि टॉयलेट हटविण्यास दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला.
त्यामुळे महापालिकेच्या नगर रचना विभागाच्यावतीने सदर घरावर कारवाई करण्यासंदर्भात हेस्कॉम, केयुआयडीबी व इतर विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्याचबरोबर एपीएमसी पोलिसांनाही बंदोबस्त देण्यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी अथणीकर यांच्या घराचे वीज कनेक्शन, पाणीपुरवठा व ड्रेनेजलाईन तोडण्यात आली. ब्रेकरच्या साहाय्याने सेटबॅकमध्ये बांधण्यात आलेले स्टेरकेस व टॉयलेट पाडण्यात आले. तक्रारदार रायबागकर यांच्या घराचे रॅम्पदेखील यापूर्वी महापालिकेने हटविले होते. मात्र त्यांनी ते पुन्हा बसविल्याचे निदर्शनास आल्याने सदर रॅम्पही हटविण्यात आला.