For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युरोपमध्ये हल्ल्याचा हमासचा कट

06:53 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
युरोपमध्ये हल्ल्याचा हमासचा कट
Advertisement

मोसादच्या दाव्यामुळे युरोपमध्ये खळबळ : अनेक संशयित दहशतवाद्यांना अटक

Advertisement

► वृत्तसंस्था/ तेल अवीव

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने युरोपच्या सुरक्षेवरून मोठा दावा केला आहे. गाझामध्ये सक्रीय दहशतवादी संघटना हमासने युरोपच्या अनेक देशांमध्ये एक गुप्त शाखा उभी केली आहे. या गुप्त शाखेने मागील काही महिन्यांमध्ये स्वत:च्या हालचाली वाढविल्या आहेत. युरोपीय यंत्रणांसोबत मिळून यापूर्वी हमासचे अनेक कट उधळण्यात आल्याचे मोसादकडून सांगण्यात आले आहे. जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाईदरम्यान अनेक संशयितांना पकडले आहे. तपास पथकांना व्हिएन्ना येथे एका ठिकाणी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा मिळाला, ज्यात पिस्तुल, विस्फोटक सामग्री आणि सैन्यवापराची सामग्री होती. ही सर्व सामग्री तत्काळ हल्ल्यासाठी तयार ठेवण्यात आली होती आणि याचे थेट कनेक्शन हमासशी संबंधित मोहम्मद नईमपर्यंत असल्याचे तपासात आढळून आल्याचे हमासने म्हटले आहे.

Advertisement

जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा संबंध मोहम्मद नईमशी आहे. मोहम्मद नईम हा हमासच्या वरिष्ठ राजकीय ब्युरोत महत्त्वाचे स्थान बाळगणाऱ्या बासेम नईमचा पुत्र आहे. बासेम नईम हा गाझामधील हमासचा मोठा नेता खलील अल-हयाचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. हे पूर्ण नेटवर्क हमासच्या विदेशात बसलेल्या नेत्यांच्या थेट देखरेखीत काम करत होते असे मोसादचे सांगणे आहे.

कतार कनेक्शन

कतारमध्ये असलेल्या हमासच्या नेत्यांनी युरोपमधील हल्ल्याच्या कटांना समर्थन दिले आहे. कतारमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत मोहम्मद नईम आणि त्याच्या पित्याची भेट झाली होती. ही वैयक्तिक भेट नव्हती तर हल्ल्याच्या कटांना हमास नेतृत्वाकडून मंजुरीसाठी होती असा दावा मोसादने केला आहे.

तुर्कियेशी देखील संबंध

युरोपमध्ये सक्रीय हमासच्या या नेटवर्कचा एक हिसस तुर्कियेशी देखील जोडलेला आहे. जर्मनीत चालू महिन्यात बुरहान अल-खतीब नावाच्या इसमाला अटक करण्यात आली, बुरहान हा दीर्घकाळापासून तुर्कियेत हमासशी निगडित कारवायांना बळ पुरवत होता. तुर्किये मागील काही वर्षांपासून हमाससाठी एक महत्त्वाचे ठिकाण मानले जात आहे. याचमुळे युरोपीय यंत्रणांनी तेथील नेटवर्कवर सातत्याने नजर ठेवलेली आहे.

वित्तपुरवठ्यावर नजर

हमासला आर्थिक मदत पोहोचविणे किंवा कट्टरवादी विचार फैलावण्याचा संशय असलेल्या संघटनांवर युरोपीय सुरक्षा यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. चॅरिटी संस्था, विविध फौंडेशन आणि धार्मिक संस्थांना आता कठोर तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागतेय. अनेक ठिकाणी वित्तपुरवठ्याच्या माध्यमावर देखरेख आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हमास विदेशात सक्रीय

इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासने विदेशात स्वत:च्या कारवायांची कक्षा वेगाने वाढविली आहे. हमासने शस्त्रास्त्रांची जमवाजवम, लॉजिस्टिक सपोर्ट तयार करणे, लोकांची भरती वाढविणे आणि गुप्त शाखा निर्माण करण्यावर विशेष लक्ष देल आहे. हमास आता इराणच्या रणनीतिच्या धर्तीवर एक आंतरराष्ट्रीय भूमिगत नेटवर्क उभे करत असल्याचा आरोप मोसादने केला आहे.

Advertisement
Tags :

.