हमास नामशेष होण्याच्या मार्गावर!
उत्तर गाझामधील कमांड सेंटर इस्रायलने केले उद्ध्वस्त, आता मध्य व दक्षिण गाझाकडे मोर्चा वळवण्याची तयारी
वृत्तसंस्था/ गाझा सिटी
गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याऐवजी तीव्र झाले आहे. उत्तर गाझाचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे कमांड सेंटर पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. पॅलेस्टिनी सैन्य आता केवळ तुरळकपणे आणि कमांडरशिवाय या भागात कार्यरत असल्याचे लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे.
इस्रायलने उत्तर गाझामध्ये सुमारे 8,000 दहशतवाद्यांना ठार केले आहे. या मोहिमेनंतर इस्रायलने हमासला उखडून टाकल्याशिवाय थांबणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. उत्तर गाझामधील हमासची सर्व ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर आता इस्रायली लष्कराचे लक्ष मध्य आणि दक्षिण गाझाकडे आहे.
इस्रायल संरक्षण दल (आयडीएफ) आता दक्षिण आणि मध्य गाझामधील हमासचा खात्मा करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने 22,000 हून अधिक लोक मारले आहेत. गेल्या 24 तासांत 120 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे 23 लाख लोकसंख्येपैकी बहुतांश लोक बेघर झाले आहेत.
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या बंदूकधाऱ्यांनी दक्षिण इस्रायलवर अचानक हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास 1,200 लोकांना ठार करण्याबरोबरच सुमारे 240 लोकांना ओलीस ठेवले. या ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलचे प्रयत्न सुरूच आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा हमासचा खात्मा करण्याची मोहीम सुरूच ठेवण्याची घोषणा करतानाच सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असल्याचेही जाहीर केले आहे.