हमासचा म्होरक्या इस्माईल हनिया ठार
इस्रायलने इराणमध्ये निवासस्थानावर केला हल्ला, इस्रालय-पॅलेस्टाईन युद्धावर परिणाम शक्य
वृत्तसंस्था / तेहरान
पॅलेस्टाईनचे प्रशासन चालविणाऱ्या हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेचा प्रमुख इस्लाईल हनिया याचा मृत्यू झाला आहे. तो इराणमध्ये वास्तव्यास होता. त्याच्या निवासस्थानावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तो ठार झाल्याचे वृत्त इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. बुधवारी मध्यरात्री 2 वाजता इस्रायलच्या निवासस्थानात करण्यात आलेल्या कारवाईवेळी करण्यात आलेल्या गोळीबारात त्याचा अचूक लक्ष्यवेध केला. त्यामुळे निवासस्थान उद्ध्वस्त झाले असून हनियाही ठार झाला, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेले अनेक महिने पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध होत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्रायलमध्ये घुसखोरी करुन अनेक निरपराध ज्यू नागरिकांची हत्या केली होती. तसेच ज्यू महिलांवर अनन्वित अत्याचार केले होते. 50 हून अधिक इस्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आणि अपहरण झालेल्यांची सुटका करण्यासाठी इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला होता. त्यातून हे युद्ध भडकले आहे. या पार्श्वभूमीवर हनियाचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू ही घटना महत्वाची मानली जात असून या घटनेचा युद्धावर परिणाम होणे शक्य आहे.
इराणकडून वृत्ताला दुजोरा
हनिया याच्या मृत्यूच्या वृत्ताला इराणच्या प्रशासनाने दुजोरा दिला आहे. बुधवारी मध्यरात्री 2 वाजता हनिया याच्या निवासस्थानावर इस्रायली झिओनिस्ट धर्मांध शक्तींनी हल्ला केला होता. त्यात हनिया याची हत्या झाली, अशी माहिती इराणने दिली आहे. हनिया याच्या हत्येने जगभरात खळबळ उडाली आहे.
इराणमध्ये कशासाठी आला होता?
इस्माईल हनिया हा कतार या देशात वास्तव्यास असून त्याचे इराणची राजधानी तेहरान येथेही निवासस्थान आहे. कतारमधून तो हमासचे आणि पॅलेस्टाईनचे नेतृत्व करीत होता. इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष मसूद पेझेश्कीयान यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी तो तेहरान येथे आला होता. हीच वेळ साधून इस्रायलने त्याच्या निवासस्थानावर हल्ला केला, अशी माहिती देण्यात आली आहे.
इस्रायलची सेना सज्ज
हनिया याच्या मृत्यूची तीव्र प्रतिक्रिया पॅलेस्टाईन आणि गाझापट्टीत उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्रायलने आपल्या सेनेला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी आम्ही सज्ज आणि दक्ष आहोत, असे इस्रायलच्या सरकारने स्पष्ट केले असून गाझापट्टीत प्रवेश केलेल्या आपल्या सैनिक तुकड्यांनाही सज्ज राहण्याची सूचना केली आहे. इस्रायलच्या उत्तरेकडे लेबेनॉनमध्ये कार्यरत असणाऱ्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेकडून हनिया याच्या मृत्यूनंतर हल्ला होण्याची शक्यता धरुन इस्रायलने तयारी चालविली आहे. हमासप्रमाणे हिजबुल्लालाही इराणचे समर्थन आणि शस्त्रसाहाय्य मिळत आहे.
कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू
गेल्या एप्रिल महिन्यात इस्रायलच्या विमान हल्ल्यांमध्ये हनिया याचे तीन पुत्र आणि चार नातवंडे यांचाही मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली होती. हनिया याच्या कुटुंबातील आठ व्यक्ती इस्रायल-हमास युद्धकाळात मारल्या गेल्या आहेत, अशीही माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली आहे. सध्या या युद्धात हमासचे नेतृत्व याह्या सिनवार यांच्याकडे असून ते हनिया याचे उजवे हात मानले जातात.
इस्माईल हनिया कोण?
62 वर्षांचा इस्माईल हनिया याचा जन्म गाझापट्टीत गाझा शहरानजीकच्या एका निर्वासितांच्या छावणीत झाला होता. त्याचे वडील इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले होते, असे म्हटले जाते. 1980 मध्ये त्याने हमास या संघटनेत प्रवेश केला. हमासचे संस्थापक आणि इस्लामी धर्मगुरु शेख अहमद यासीन यांचा विश्वास त्याने लवकरच संपादन केला. त्यामुळे त्याची हमासमध्ये झपाट्याने पदोन्नती झाली. 1980 ते 1990 या काळात त्याने अनेक वर्षे इस्रायलच्या कारागृहांमध्ये व्यतीत केली होती. नंतर त्याची सुटका करण्यात आली होती. 2006 मध्ये पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या निवडणुकीत हमासचा विजय झाल्यानंतर त्याची पॅलेस्टाईनच्या प्रमुख नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, 2007 मध्ये त्याला पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांनी या पदावरून काढले होते. 2017 मध्ये त्याची हमासच्या राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून निवड झाली होती. इस्रायलपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने कतारचा आश्रय घेतला होता. इराणमध्येही त्याचे वास्तव्य होते. इस्रायल-हमास यांच्यात सध्या होत असलेल्या युद्धात त्याने काहीकाळ युद्धबंदीसाठी मध्यस्थ म्हणूनही काम केले. तथापि, युद्धबंदीसाठी प्रयत्न केल्याचे वरकरणी दाखवत असताना त्याने प्रत्यक्षात युद्ध भडकविण्याचे काम चालविले होते, असा त्याच्यावर आरोप केला जातो.
हनियाच्या मृत्यूमुळे उलथापालथ शक्य
ड दहशतवादाच्या क्षेत्रात हनिया याचे महत्व ओसामा बिन लादेनसारखे
ड इस्रायलवरील 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप
ड इस्रायलकडून आपल्या सर्व सीमाक्षेत्रांमध्ये सेनेला सज्ज राहण्याचा संदेश