हमास हद्दपार, युएईकडे नियंत्रण
नेतान्याहू-ट्रम्प यांच्यात गाझा युद्ध रोखण्याचा नवा प्लॅन : अब्राहम कराराचा होणार विस्तार
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इराणशी युद्धविरामानंतर इस्रायल आता गाझामध्येही संघर्ष रोखू शकतो. गाझामधील युद्ध रोखणे आणि स्थायी शांततेचा मार्ग शोधण्यासाठी इस्रायल अन् अमेरिकेच्या नेत्यांदरम्यान प्रदीर्घ चर्चा झाली आहे. या मुद्द्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि सामरिक विषयक मंत्री रोम डर्मर यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये गाझाच्या प्रशासनाची धुरा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातकडे सोपविण्यावर आणि अब्राहम कराराच्या विस्तारावर चर्चा झाली आहे.
गाझामधील युद्ध संपुष्टात आणणे आणि अब्राहम कराराचा विस्तार करण्याच्या व्यापक योजनेवर ट्रम्प, नेतान्याहू, रुबियो आणि डर्मर यांनी सहमती दर्शविली आहे. या योजनेनुसार पॅलेस्टिनी गट हमासच्या नेत्यांना प्रशासनातून बाहेर काढले जाणार आहे. तर युएई आणि इजिप्तसमवेत 4 अरब देशांना गाझाचे शासन सांभाळण्याची जबाबदारी दिली जाणार आहे.
ट्रम्प यांच्या योजनेच्या अंतर्गत गाझा मुद्द्यावर तोडगा काढण्यावर चर्चा करत नवे अरब देश अब्राहम करारात सामील होणार आहेत. अब्राहम कराराद्वारे हा इस्रायल आणि अरब देश यांच्यातील संबंध सुरळीत होणार आहेत. अब्राहम कराराला अरब देश आणि इस्रायलदरम्यान सेतूप्रमाणे ठरणार आहे. अमेरिका दीर्घकाळापासून या कराराच्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहे.
गाझा मुद्द्यावर तोडगा म्हणून इस्रायलला भविष्यात पॅलेस्टाइन देशाचे समर्थन करण्यास सांगण्यात येणार आहे. अमेरिका पश्चिम किनाऱ्यावर आंशिक इस्रायली सार्वभौमत्वाला मान्यता देणार आहे. या योजनेवर वेगाने पावले टाकली जात आहेत. यातील पहिले पाऊल गाझामध्ये युद्ध पुढील दोन आठवड्यांमध्ये समाप्त करणे असेल. यावर लवकरच घोषणा केली जाऊ शकते.
ऑक्टोबर 2023 पासून युद्ध
गाझापट्टीत ऑक्टोबर 203 पासून लढाई सुरू आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये हल्ले करत 1200 जणांची हत्या केली होती आणि 251 जणांचे अपहरण केले होते. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझामध्ये हवाई हल्ले सुरू केले होते. इस्रायल 20 महिन्यांपासून गाझामध्ये कारवाई करत आहे. या कारवाईत 60 हजारांहून अधिक लोक मारले गेले असून गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तर 20 महिन्यांनंतरही देखील इस्रायलला अद्याप सर्व ओलिसांची मुक्तता करवून घेता आलेली नाही. हमासच्या ताब्यात अद्याप 49 ज्यू असल्याचे मानले जाते. यातील 20 ज्यू जिवंत आहेत, तर 28 ज्यूंचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.