हमास प्रमुखाचा मृत्यू झाल्याचा संशय
गुप्त अहवालानंतर चौकशी सुरू : इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेल्याची चर्चा
वृत्तसंस्था/ तेल अवीव
गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान हमास प्रमुख याह्या सिनवारचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात सिनवार मारला गेला आहे का याबद्दल इस्रायल आता तपास करत आहे. सैन्य गुप्तचर माहितीच्या आधारावर हा तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.
सिनवार हा गाझामधील आयडीएफच्या ऑपरेशनदरम्यान मारला गेला होता असा संशय आहे. परंतु याबद्दल ठोस माहिती अद्याप हाती लागली नसल्याने इस्रायलचे अधिकारी काहीही बोलण्यास नकार देत आहेत. अलिडकच्या आठवड्यांमध्ये सिनवारशी कुठलाही संपर्क होऊ न शकल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे.
आयडीएफने काही दिवसांपूर्वी गाझामधील एका शाळेवर हवाई हल्ला केला होता. तेथे हमासचे कमांड सेंटर होते. या हल्ल्यात 22 जण मारले गेले होते. याच हवाई हल्ल्यात सिनवारचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 31 जुलै रोजी इराणमध्ये इस्माइल हानियेहचा मृत्यू झाल्यावर सिनवारला हमासचा नवा प्रमुख म्हणून निवडण्यात आले होते.
इस्रायलवरील हल्ल्याचा सूत्रधार
याह्या सिनवार हा मागील वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानला जातो. या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायली नागरिक ठार झाले होते. तर 254 जणांचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठी मोहीम हाती घेतली होती.
माइंड गेम असण्याचीही शक्यता
काही इस्रायली अधिकारी हमास कमांडर्सच्या विरोधात मनोवैज्ञानिक युद्धाचा वापर करत आहेत. याच्या माध्यमातून इस्रायली ओलिसांच्या मुक्तता केल्यास स्वत:च्या बचावासाठी काही तडजोड करण्यासाठी हमास कमांडर्सना भाग पाडण्याचा प्रयत्न आहे.