गैरहंगामीची बरसात, हक्काचा पाऊस होणार दुरापास्त
कृष्णा डोणे महाराजांची भाकणूक : शिवाजी महाराजांचा जय जयकार करा : धर्माच्या गादीला रामराम ठोका :नणदी येथे हालसिद्धनाथांची यात्रा उत्साहात : विविध विषयांवर वर्तविली भविष्यवाणी
उत्तम काटकर/एकसंबा
नणदी (ता. चिकोडी) येथे हालसिद्धनाथांच्या वर्षीही भोग पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रेत कृष्णा डोणे महाराज यांनी 8 रोजी पहाटे विविध विषयांवर भाकणूक सांगितली. खासकरून यंदाच्या भाकणुकीत गैरहंगामी पाऊस पडल, हक्काचा पाऊस मिळणार नाही अशी भविष्यवाणी वर्तविली. तसेच कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल, जगात युद्ध पटेल. देशात समान नागरी कायदा येईल. नणदी नणदीवाडी पंढरीचे रक्षण करेल असे कथन त्यांनी केले. सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही भोंब पौर्णिमेनिमित्त होणारी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाकणूक सांगताना डोणे महाराज पुढे म्हणाले, पोती पुराण वाचून दाखवावे, क्रिया चालवित खोटे तू बोलशील तर मी खरे करेण, पेरलं ते उगवलं. मेघ उदंड हाय, बांधा आड बांध शिवा आड शिव हाय. मेघाची कावड गैरहंगामी उदंड पावल, मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणगिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे. तो दुनिया न्याहाळत हाय, त्याच्या मागे ही अंधार हाय, पुढेही अंधार पडला हाय, नणदीकर सरकार घराणे क्षत्रिय हाय, नणदीकर घराण्याला माझा आशिर्वाद हाय, नणदी गावचा महिमा वाढत जाईल. धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा.
पाऊस दगा देईल
सरता मिरग निघता आडद्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल. सरता आडद्रा निघता तारणा, अल्लम दुनियेचा होईल. कुरी थाऱ्याला बसलं, रोहिणीची पेरणी हादग्याची पुरवणी होईल. देवधान्य बहुता उदंड पिकंल, पाऊस, पिके यांचे कालमान बदलत जाईल. देवयान धान्य मध्यम पिकल, राजयान धान्य उदंड पिकल, खरीप उदंड पिकल, मोलान विकल, गोरगरिबाला पुरावा करल. जमिनीतील धान्य बहुत बेमान. तांबडी रास मध्यम पिकल, कालयान धान्य सुफळ जाईल, पांढरे धान्य उदंड पिकलेली, मोलान विकल. पारवे फुल सुफळ जाईल. गव्हाची पेंढी मध्यम पिकल मोलान विकल. हुकमी पाऊस दगा देईल, तापमानाचा पारा गगनाला जाईल, पाणी टंचाई भासल. दीड महिन्याच पीक येईल.
वैरण, धान्याची चोरी होईल
धान्य दारात वैरण कोपऱ्यात ठेवाल, वैरण सोन्याची होईल, सांभाळून रहा. वैरण धान्याची चोरी होईल. कानाने ऐकाल, डोळ्याने पाहणार नाही. ज्याच्या घरी धान्य तोच शहाणा होईल. लुगडी, धोंगडी, कपडा, लत्ता फुकाचा होईल. मेंढी मोलाची होईल, मेंढीयान पालखीतून मिरवेल, सोन्यापेक्षा पिवळे होईल. बकऱ्याची किंमत एक लाखाच्या घरात जाईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडे माणसाच्या पाठी लागेल, धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाल मिठी मारल. जगामध्ये एक मोठे नवल होईल, मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. कळपातला बकरा कळपात लढेल, दुनिया पेटेल, काळरात्र होईल.
सोन्या-चांदीचा भाव चढत जाईल
पहिला मोगरा झोपून जाई, दुसरा मोगरा मध्यम राहिल, तिसरा मोगरा राज्य करेलं. सरती रोहिणी निघता मृग कुरी मिरवेल. बांधा आड बांध शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा, साधंल तो सज्जन, हातात भाकरी, खांद्यावर चाबूक साधल तो साधंल. माणसाला माणुस खाऊन टाकेल, सांभाळून रहा. माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील. सोन्या, चंदीचा भाव चढत राहील, जगात धर्म बुडून गेला आहे. पाची बोटाने मानवाने धर्म करावा. वांग्याच्या झाडाला शिडी लावाल, हरभऱ्याच्या झाडावर चढून बसाल, सोन्या चांदीचा भाव चढत जाईल.
कलियुगात अल्पायुष्य आहे
भारत-पाकिस्तान छुपे युद्ध होईल. भारतीय सैन्य छातीची ढाल करुन लढत राहतील. भारत मातेचा जयजयकार करतील. चीन राष्ट्र भारतावर आक्रमण करेल. भारतीय सेना त्यांना परतावून लावेल. भारत-चिन संबंध बिघडत जातील. गेलेला माणूस परत येईल याची शाश्वती राहणार नाही. चालत्या बोलत्या माणसाचा प्राण जाईल, कलियुगात अल्पायुष्य आहे. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल, बसव राजा पालखीतून मिरवेल, जातीवादी राजकारण चालेल, निपाणी भागात मोठा गोंधळ होईल, अतिरेकी लोक घोटाळा करतील. बाँम्ब स्फोट होऊन शहरे उद्धवस्त होतील. दिल्लीच्या गादीला मोठा धोका बसेल, युद्धे होतील, रक्ताचे पाठ वाहतील.
पैशाच्या जोरावर न्याय मिळल
पैशाच्या जोरावर न्याय मिळल, कामगार लोक दडून बसतील. देशावर संप, हरताळाची वेळ येईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील. कृष्णाकाठी 9 लाख हजार बांगड्या फुटतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकाय करा, शिवाजी महाराज कोणाच्यातरी पोटी जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करल. हिमालय पर्वतावर भगवान अवतार घेतील. कर्नाटक राज्यात राजकारणात मोठी उलथापालथ होईल. जातीच्या राजकारणाला ऊत येईल. सत्तेसाठी भांडतील, सत्ता, संपत्तीच्या मागे लागतील. राजकीय नेत्यांचे मोठे घोटाळे उघडकीस येतील, राजकारणात राजकीय नेते विकत मिळतील, राजकारणात पैसा न खाणारा नेता भेटणार नाही. सीमाभागाच राजकारण ढवळून निघल.
गुरु वाचून विद्या नाही
महागाईचा भस्मासूर सुटेल, पेट्रोल, इंधन याने जनता हैराण होईल. सामान्य माणसाला जगणे मुश्किल होईल. देवस्थान देवळावर दरोडे पडतील. दागिने, पैसा माणसाला घातक होईल. माणसाला माणूस खावून टाकेल. पृथ्वीचा चौथाई कोणा ओसाड पडल. भावाल बहीण वळखेना, सासऱ्याला सून ओळखेना. बहीण भावाच्या नात्याला कलंक लागलं. 9 वर्षाची मुलगी भरतार मागेल. 12 वर्षाची मुलगी आई होईल. उगवत्या सुर्याला मोठे संकट पडले आहे. चंद्र सुर्याची आकस्मात टक्कर लागेल, उगवतं पेटेल, मावळत विजेल. कोल्हापुरच्या देवीला मोठे संकट आहे. रात्री 12 च्यावेळेला तिच्या डोळ्यातून पाणी पडते आहे. चैत्राच्या महिन्यात गायी चरायला माळाला जातील. बापा वाचून धडा नाही, गुरु वाचून विद्या नाही.
व्यापारी लोक शेतकऱ्यांना लुबाडतील
रसायन धान्य उदंड पिकल, मोलान विकल. उसाला धारण, माणसाला मरण, उसाचा काऊस होईल. सडकेवर पडेल, शुगर फॅक्टीचा मॅनेजर आनंदात राहील. साखरेचे भाव तेजा-मंदीत राहतील. चढल उतरलं, गुळाचा भाव उच्चांक गाठल, तेजीत राहिल. उसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्या राज्यात गोंधळ होईल. आंदोलन पेटेल, शेतकरीवर्ग चिंतेत राहिल. उसाचा दर 3 हजार, 3500 वरून 4 हजारावर जाईल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. तंबाखूची पेंढी मध्यम पिकलं, मोलान विकलं. तंबाखुचा बंबाखू होईल. तंबाखुचा भाव गगनाला भिडेल. मांडवाच्या दारी 2000 म्हणतील 2000 ते 1800 होईल. 1800 म्हणता म्हणता 1500 चढल उतरलं. व्यापारी लोक शेतकऱ्यांची लुबाडणूक करतील.
धर्माचा पाऊस कर्माचे पीक
श्रावण महिन्यात गायी गंगेला जातील व चैत्र महिन्यात गायी माळाला जातील. पाऊस पाऊस पाणी पाणी असा कालवा कराल. नदीला कुलूपे पडतील, मेघराज ताळतंत्र सोडेल. अतिवृष्टी होईल. पाण्याचा कप विकत मिळेल. पाण्यासाठी जगात आंदोलन होईल. उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा होईल. कर्नाटकाच्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल, तो भाग जलमय होईल. धर्माचा पाऊस कर्माचे पीक पडेल. मेघराजाची वाट बघत युद्ध होतील, रक्तपाट वाहतील. पंच लोक दोन्हीकडून लाच खावून भांडणे लावतील. मोठे लोक दडून बसतील. कळपातला बकरा कळपात लढेल, दुनिया पेटेल, काळरात्र येईल. गायी-म्हशीचे भाव गगनाला, मायीचे लेकरु मायीला ओळखायचे नाही, गायीचे वासरु गायीला भेटणार नाही.
युध्दाच्या स्पर्धा लागतील
जगातील अनेक राष्ट्र एकमेकात युद्ध करतील. अनेक देश युध्दात उतरतील, युध्दाच्या स्पर्धा लागतील. एकमेकाचा भाग काबीज करतील. कोल्हापूरच राजघराण क्षत्रिय हाय. कोल्हापूर साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. घरातून गेलेला मणुष्य घरला परत येईल ही आशा नको. ठेचेला मरण आहे. माणसाच्या हातातील भाकरी हातात राहिल. गायी म्हशीला न तुम्ही गहू घालाल व रेड्या पाड्याला तुम्ही पंद घालाल. कुणब्याचे बाळ विचारात पडले आहे. कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे.
कराल सेवा तर खाल मेवा
नणदी-नणदीवाडीच्या लेकरांनो तुम्ही एकीने वागा. कराल सेवा तर खाल मेवा. कराल चाकरी तर खाल भाकरी. पांढरीची राखण करीन गावातील इडा पिडा मी दूर करीन. कांबळ्याचा शेवट धरीण तुमचा मी सांभाळ करीन, अशी भाकणूक त्यांनी सांगितली. शेवटी मानकरी व सेवेकऱ्यांना मानाचा भंडारा देऊन भाकणुकीची सांगता झाली.