हलकर्णी ग्रा. पं.च्या कारभाराविरोधात नागरिकांचा मोर्चा
विकास अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी : आठवड्यात कामे पूर्ण न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा
खानापूर : शहराला लागूनच असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या काराभाराविरोधात मंगळवारी हलकर्णी गावातील नागरिकांनी ग्राम पंचायतीवर मोर्चा काढून चाललेल्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार निदर्शने करत ग्रा. पं. च्या कामात सुधारणा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. येत्या आठ दिवसात ग्रा. पं. ची कामे सुरळीतपणे न झाल्यास ग्राम पंचायतीला घेराव घालून टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. खानापूर शहराच्या प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीत गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत कारभार सुरू आहे.
हलकर्णी गावातील स्वच्छता, कचऱ्याची उचल न करणे, गटारीची साफसफाई न करणे, पाणीपुरवठा सुरळीत न करणे यासह नागरिकांच्या शासकीय कामात आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेवर न मिळणे, ग्रा. पं. च्या कामासाठी ग्रामस्थांची अडवणूक करणे, तसेच विकासकामांबाबत पंचायतीकडून कोणतीही योजना सुरळीत न राबवणे यासह अनेक कारणांनी हलकर्णी ग्रा. पं.चा भोंगळ कारभाराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार सूचना करून देखीलही गेल्या काहीवर्षात ग्रा. पं. च्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही.
यासाठी हलकर्णी ग्रामस्थांनी ग्रा. पं.वर मोर्चा नेऊन जोरदार निदर्शने केली. विकास अधिकारी पानीवाले यांनी या निदर्शनाकडे साफ दुर्लक्ष करून ग्राम पंचायतीत बसून राहिल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विकास अधिकाऱ्यांचा निषेध केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दिनकर मरगाळे यांनी याबाबतची माहिती ता. पं. अधिकाऱ्यांना दिली. ता. पं. अधिकारी रमेश मेत्री यांनी पानीवाले यांना संपर्क साधून आंदोलकांबरोबर चर्चा करण्याची सूचना केली.
आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पीडीओr पानीवाले यांच्याकडे देवून कचऱ्याची उचल, पाणीपुरवठा, गावातील स्वच्छतेची त्वरित अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांची कामे वेळेवर करून द्यावीत, अशा सूचना मांडल्या. पानीवाले यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपल्या मागण्यांची पूर्तता करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या आठ-दहा दिवसात ग्रा. पं. च्या कारभारात सुधारणा न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या मोर्चात ग्रा. पं. माजी सदस्या लता वडियार, हणमंत वडियार, अविनाश खानापुरी, विष्णू बेळगावकर, प्रवीण चौगुले, रेणुका कुंभार, नारायण खानापुरी, रमेश खानापुरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.