सुवर्ण विधानसौधजवळील हालगा अद्याप तहानलेलेच
पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई : सुवर्ण विधानसौधला जमीन देऊनही गाव सुविधांपासून वंचित : पाण्यासाठी घ्यावा लागतोय टँकरचा आधार
वार्ताहर /किणये
पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र याच पाण्यासाठी हालगा गावातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सुवर्ण विधानसौधजवळ असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन दरबारी मागणी करीत आहेत. मात्र सरकारने येथील पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. सरकारने बेळगावमधील सुवर्ण विधानसौधसाठी गावची जमीन संपादन केली. गावातील तऊणांना नोकऱ्या देतो, असे त्यावेळी आश्वासन दिले होते. तसेच गावाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार, असेही सांगितले होते. मात्र या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आम्ही दाद मागायची कुणाकडे? असा सवाल इथले नागरिक करत आहेत.
...तर अन्य गावांचे काय ?
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग हालगा-बस्तवाड गावाजवळ सुवर्ण विधानसौध बांधण्यात आली. यामुळे या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या या विधानसभेमध्ये कर्नाटक सरकारचे अधिवेशन सुरू असल्यामुळे लोकप्रतिनिधी नेतेमंडळींची गर्दी होऊ लागली आहे. बरेच जण विविध मागण्यांसाठी मोर्चेही काढू लागले आहेत. मात्र याच सुवर्ण विधानसौधला आपल्या गावची जागा देऊनही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. सुवर्णसौधजवळ असलेल्या गावातील नागरिकांची ही स्थिती तर अन्य ठिकाणच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देणार कसे असा सवाल सर्वसामान्य जनता उपस्थित करीत आहे.
गावात आठ दिवसाआड पाणी
गावात आठ दिवसातून एकदा पाणी येते. यामुळे पाण्यासाठी आम्हाला भटकंती करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा यासाठी महिलांनी याआधी बऱ्याच वेळा मोर्चे, निवेदने दिलेली आहेत. गतवषीही अधिवेशनच्या कालावधीत महिलांनी घागर मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला होता. मात्र वारंवार मागणी करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता महिलासुद्धा कंटाळल्या आहेत.
डॅमचे पाणी पुरविण्याची मागणी
सध्या गावात जलजीवन योजनेअंतर्गत पाईपलाईनचे कामकाज सुरू आहे. या योजनेअंतर्गत गावातील कूपनलिकांचे पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. मात्र गावात पाण्याचा स्रोत कमी आहे, अशी माहिती काही जाणकारांनी दिली. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी या गावाला अन्य डॅमचे थेट पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सध्या टँकरने पाणी विकत घ्यावे लागते
गावात गेल्या 40 ते 45 वर्षापासून पिण्याचे पाणी सुरळीत नाही. या समस्येकडे कोणीही जातीने लक्ष देत नाहीत. यामुळे आम्हा महिलांना पाण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. जानेवारीपासून तर गावातील पाणी पूर्णपणे बंद होते. सध्या तरी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. या गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.
- अंजना संताजी
शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प राबवा
गावातील नळांना पाणी नसल्यामुळे सुवर्ण विधानसौधजवळील पाणी आणावे लागते. मात्र इतक्मया लांबून महिलांना पाणी आणणे मुश्कील झाले आहे. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प बसविण्याची गरज आहे.
- जयश्री बिळगोजी
गावात येणारे पाणे पिण्यासाठी योग्य नाही
गावात तीन विहिरी व 16 कूपनलिका आहेत. मात्र गावात पाण्याचे स्रोत कमी असल्यामुळे नळांना पाणी येत नाही. गावात येणारे पाणे पिण्यासाठी योग्य नाही. सध्या जलजीवन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 4 कोटी 54 लाख ऊपये मंजूर झाले आहेत. पाईपलाईनचे कामकाज जोमाने सुरू आहे. इतर डॅमचे पाणी पुरविल्यास समस्या दूर होऊ शकते.
- सदानंद बिळगोजी