हलगा महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ
देवीचा लग्नसोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा : हजारो भाविकांची पहाटेपासूनच उपस्थिती
वार्ताहर/सांबरा
हजारो भाविकांच्या उपस्थितीत व श्री लक्ष्मीदेवीच्या जयघोषात मंगळवारी हलगा येथे श्री महालक्ष्मी देवीचा लग्नसोहळा उत्साहात पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी पहाटेपासूनच उपस्थिती दर्शविली होती. येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवार दि. 18 पासून प्रारंभ झाला. सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी देवीचा लग्न सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी हलगा गावचे हक्कदार सुरेंद्र देसाई, चंदा देसाई, कल्लाप्पा देसाई यांच्या हस्ते महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर महालक्ष्मी यात्रा उत्सव कमिटी व पंच मंडळ कमिटीच्यावतीने महालक्ष्मी देवीची विधिवत ओटी भरण्यात आली.
या कार्यक्रमानंतर भाविकांना देवीचे दर्शन घेण्यासाठी व ओटी भरण्यासाठी प्रारंभ करण्यात आला. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात विठ्ठल रखुमाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळाही पार पडला. हलगा येथील बालाजी काँक्रीटचे मालक सचिन सामजी दांपत्याच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना मंत्रोपचार व विधिवत पूजनाने करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास हलगा पंचक्रोशीतील असंख्य भाविक, नातेवाईक, पै पाहुणे मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थित होते. मंदिर परिसर अक्षरश: भाविकांनी तुडुंब भरला होता. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बुधवार दि. 19 रोजी सार्वजनिक ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर व भंडाऱ्याची उधळण करण्यात येणार आहे. लक्ष्मी गल्ली येथील लक्ष्मी मंदिर ते ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे. गुऊवार दि. 20 रोजी छत्रपती संभाजी गल्ली, लक्ष्मी चौक व छत्रपती शिवाजी महाराज गल्ली यांच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 21 रोजी गावातील जैन समाजाच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे. शनिवार दि. 22 रोजी गावातील दोन्ही आंबेडकर गल्लीतील ग्रामस्थांच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे.
रविवार दि. 23 रोजी नवी गल्ली व बसवाण गल्ली यांच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे. त्याच दिवशी रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित महानाट्या सादर करण्यात येणार आहे. सोमवार दि. 24 रोजी मरगाई गल्ली, गणपत गल्ली, तानाजी गल्ली व विजयनगर यांच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे. मंगळवार दि. 25 रोजी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 26 रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.