For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा-मच्छे बायपासचे काम रविवारी बंद

12:33 PM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
हलगा मच्छे बायपासचे काम रविवारी बंद
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आज भेट देण्याची शक्यता;  रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Advertisement

बेळगाव : बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हलगा-मच्छे बायपासचे काम तात्काळ थांबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शुक्रवार दि. 21 रोजी रमाकांत कोंडुसकर आणि शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन देण्यात आले होते. त्यावेळी सोमवार दि. 24 रोजी सकाळी स्वत: भेट देऊन आढावा घेऊ, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितल्याने रविवारी हलगा-मच्छे बायपासचे काम बंद ठेवण्यात आले. ठेकेदाराने जेसीबी, टिप्पर व इतर यंत्रसामग्री बाजूला उभी केली आहे.

तिबार पीक घेणाऱ्या जमिनीतून हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू असल्याने सुरुवातीपासूनच या रस्त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढा देखील सुरू आहे. रस्त्यासाठी जमिनीचे संपादन केल्यास अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सदर प्रस्तावित रस्ता रद्द करण्यात यावा. पर्याय म्हणून फ्लायओव्हर करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

Advertisement

बायपाससाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडून काढण्यात आलेले गॅझेट चुकीचे आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यासाठी संपादित करण्यात आली आहे, त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नसून, भलत्यांनाच मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्ता करण्यात येऊ नये, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांची आंदोलने जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याने चिरडून टाकली. अनेकवेळा उच्च न्यायालयासह स्थानिक न्यायालयाने स्थगिती देऊनही न्यायालयाचा आदेश पायदळी तुडविला जात आहे. जोपर्यंत झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पण सर्व नियम व आदेश धाब्यावर बसवून रस्त्याचे काम केले जात आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ थांबविण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली होती. तसेच रस्त्याची वर्कऑर्डर देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे सोमवार दि. 24 रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे सकाळी 8.30 वाजता बायपासला भेट देऊन पाहणी करण्यासह आढावा घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांने रविवारी रस्त्याचे काम बंद ठेवले होते.

Advertisement
Tags :

.