For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम दोन दिवस बंद

10:26 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम दोन दिवस बंद
Advertisement

होळीनिमित्त काम बंद?, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित मात्र भीती कायम : 4 एप्रिलला उच्च न्यायालयात स्थगितीवर सुनावणीची शक्यता

Advertisement

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम दोन दिवसांपासून बंद आहे. शेतकऱ्यांनी रविवारी त्या ठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर कामबंद ठेवण्यात आले आहे. मात्र हे काम होळी सण असल्याने बंद ठेवल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. जर कामबंद झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  4 एप्रिलला उच्च न्यायालयात या रस्त्याच्या स्थगितीवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकील हजर राहिले तरच ती सुनावणी पूर्ण होणार आहे. अन्यथा पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सपाटीकरणाबरोबरच खडीही टाकण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण आंदोलन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांनी पुन्हा या रस्त्यावर आंदोलन केले. त्यावेळी काम बंद ठेवण्यात आले. सोमवारीही काम बंदच होते. मात्र त्या ठिकाणी सर्व यंत्रसामग्री थांबून आहे. त्यामुळे सणानिमित्त काम बंद ठेवल्याची शक्यता आहे. आलारवाडपासून मच्छे गावापर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आणून हे काम केले जात आहे. या रस्त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला असता शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलन हाती घेतले आहे. मात्र या रस्त्याचे काम सुरू होते. दोन दिवस काम बंद राहिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या तरी मंगळवारनंतरच नेमके काय ते समजणार आहे. याबाबत कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

अवजड वाहनामुळे येळ्ळूर रस्ता खराब होण्याची भीती

Advertisement

या रस्त्यासाठी यरमाळ परिसरातून माती, तसेच खडी आणण्यात येत आहे. जवळपास 40 टन वजनाच्या ट्रक या रस्त्यावरून दिवसरात्र सुरू आहेत. त्यामुळे यरमाळपासून या रस्त्यापर्यंतचा रस्ता खराब होणार आहे. मुळातच हा रस्ता खराब झाला आहे. त्यातच मातीची अवजड वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे या रस्त्याची चाळण होणार, यात शंका नाही. तेव्हा संबंधित कंत्राटदाराकडून येळ्ळूर रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

शेतीला बसणार फटका

हलगा-मच्छे बायपास रस्ता झाला तर धामणे, येळ्ळूर, शहापूर, वडगाव, अनगोळ, मच्छे या परिसरातील शेतीला पुराचा फटका बसणार आहे. कारण येळ्ळूर येथील अरवाळी धरणातून येणारा पाण्याचा लोंढा, येळ्ळूर परिसर व शिवारातून बळ्ळारी नाल्याला जोडणारे पाणी पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळे येळ्ळूरच्या शिवाराला पुराचा धोका निर्माण होणार आहे. कारण रस्त्याची उंची वाढत चालली आहे. त्यामुळे पाणी उत्तरेकडे येणे अवघड होणार आहे. त्यामुळे दक्षिणेकडील पूर्ण शिवाराला पुराचा धोका निर्माण होणार आहे.

Advertisement
Tags :

.