दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत
पहिल्या दिवशी पाहुण्यांच्या 6 बाद 247 धावा : कुलदीपचे 3 बळी : स्टब्जचे अर्धशतक हुकले
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथील बरसापार स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवशी आफ्रिकेने 6 गडी गमावत 247 धावा केल्या आहेत. दिवसअखेरीस मुथ्थुस्वामी 25 तर काईल व्हेरेन 1 धावांवर खेळत होते.
गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यात जखमी शुभमन गिलच्या जागी ऋषभ पंत भारताचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मार्करम आणि रिकेल्टन या सलामी जोडीने 82 धावांची भागीदारी रचली. पण चहापानाआधी जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडली. सेट झालेल्या मार्करमला तंबूचा रस्ता दाखवत त्याने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पाठोपाठ कुलदीपने रिकेल्टनला माघारी पाठवले. त्याने 35 धावा केल्या. बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट मिळवत टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.
कुलदीपचा जलवा
दोन्ही सलामीवीर माघारी फिरल्यावर कर्णधार टेम्बा बावुमा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी संयमी खेळी साकारली. पण, दोघांनाही अर्धशतक साजरे करता आले नाही. बावुमा 92 चेंडूचा सामना करून 41 धावांवर बाद झाला. कुलदीप यादवने ट्रिस्टन स्टब्सला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या वियान मुल्डरलाही कुलदीपने 13 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर टोनी डी जोर्जी आणि मुथ्थुस्वामी यांनी 40 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमलेली असताना जोर्जीला सिराजनने बाद केले. त्याने 59 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. दिवसअखेरीस मुथ्थुस्वामी आणि काईल व्हेरेन यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने 81.5 षटकांत 6 गडी गमावत 247 धावा केल्या होत्या. भारताकडून कुलदीप यादवने 48 धावांत 3 गडी बाद केले. याशिवाय, बुमराह, सिराज आणि जडेजाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव 81.5 षटकांत 6 बाद 247 (मॅरक्रम 38, रिकेल्टन 35, ट्रिस्टन स्टब्ज 49, बावुमा 41, जोर्जी 28, मुथ्थुस्वामी खेळत आहे 25, व्हेरेन खेळत आहे 1, कुलदीप यादव 3 बळी).
गुवाहाटीत नवी परंपरा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गुवाहाटी मैदानावर इतिहास रचण्यात आला. क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, कसोटी सामन्यात दुपारच्या जेवणापूर्वी चहाचा ब्रेक घेण्यात आला. दिवस-रात्र कसोटी सामन्यात, जेवणापूर्वी चहा घेतला जातो, परंतु पहिल्या कसोटीचे आयोजन करणाऱ्या गुवाहाटीने एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आणि दुपारच्या जेवणापूर्वी चहाचा ब्रेक घेतला. ईशान्य भारतात लवकर सूर्योदय आणि सूर्यास्त झाल्यामुळे हा असामान्य निर्णय घेण्यात आला. परिणामी, कसोटी सामन्याचे पहिले सत्र सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत खेळवण्यात आले, त्यानंतर सकाळी 11 ते 11:20 पर्यंत चहाचा ब्रेक घेण्यात आला.