अयुब, मसूद, आगा यांची अर्धशतके
पाक प. डाव सर्व बाद 274, मेहदी हसन मिराजचे 5 बळी
वृत्तसंस्था /रावळपिंडी
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खैळाच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशने पाकला पहिल्या डावात 274 धावांवर रोखले. त्यानंतर दिवसअखेर बांगलादेशने बिनबाद 10 धावा जमविल्या. पाकतर्फे सईम अयुब, कर्णधार शान मसुद आणि सलमान आगा यांनी अर्धशतके झळकविली. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने 61 धावांत 5 तर तस्किन अहम्मदने 57 धावांत 3 गडी बाद केले.
या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकला पराभूत करुन आघाडी यापूर्वीच घेतली आहे. या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. या कसोटीत शुक्रवारी खेळाचा पहिला दिवस पावसामुळे पूर्ण वाया गेला.
पाकच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकात सलामीचा अब्दुल्ला शफीक खाते उघडण्यापूर्वी तस्किन अहम्मदच्या गोलंदाजीवर त्रिफळा चित झाला. त्यानंतर सईम अयुब आणि कर्णधार मसुद यांनी दुसऱ्या गड्यासाठी 107 धावांची भागिदारी केली. मसुदने 69 चेंडूत 2 चौकारांसह 57 तर अयुबने 110 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 58 धावा जमविल्या. कर्णधार बाबर अझमने 2 चौकारांसह 31 धावा केल्या. मेहदी हसन मिराजन आणि शकिबल हसन यांच्या फिरकीसमोर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. सौद शकीलने 2 चौकारांसह 16, मोहम्मद रिझवानने 2 चौकारांसह 29 धावा जमविल्या. सलमान आगाने 95 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावांचे योगदान दिल्याने पाकला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. मेहदी हसन मिराजने पाकच्या तळाचे फलंदाज झटपट गुंडाळले. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराज, तस्किन अहम्मद तसेच शकिब अल हसन यांनी प्रभावी गोलंदाजी केली. पाकचा पहिला डाव 85.1 षटकात 274 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने दिवसअखेर 2 षटकात बिनबाद 10 धावा जमविल्या. शदमान इस्लाम 6 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक पाक प. डाव 85.1 षटकात सर्वबाद 274 (सईम अयुब 58, शान महसुद 57, सलमान आगा 54, बाबर आझम 31, मोहम्मद रिझवान 29, मेहदी हसन मिराज 5-61, तस्किन अहम्मद 3-57, नाहीद राणा 1-58, शकीब अल हसन 1-34), बांगलादेश प. डाव 2 षटकात बिनबाद 10 (शदमान इस्लाम खेळत आहे 6, झाकीर हसन खेळत आहे 0, अवांतर 6)