टॉम लॅथम, केन विल्यम्सन यांची अर्धशतके, डिसिल्वाचे 2 बळी
वृत्तसंस्था/गॅले
यजमान लंका आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरूवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 4 बाद 255 धावा जमविल्या. न्यूझीलंड संघांतील टॉम लॅथम आणि विलियमसन यांनी अर्धशतके झळकविली. तत्पूर्वी लंकेचा पहिला डाव 305 धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा संघ अद्याप 50 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत.
लंकेने 7 बाद 302 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे तीन गडी केवळ 3 धावांमध्ये बाद झाले. लंकेचा पहिला डाव 91.5 षटकात 305 धावांवर आटोपला. लंकेच्या डावामध्ये कमिंदु मेंडीसने दमदार शतक झळकविताना 11 चौकारांसह 114 धावा जमविल्या. कुशल मेंडीसने 7 चौकारांसह 50 धावा केल्या. निशांकाने 5 चौकारांसह 27, चंडीमलने 3 चौकारांसह 36 तर रमेश मेंडीसने 2 चौकारांसह 14 आणि कर्णधार धनंजय डिसिल्वाने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या ओरुरकीने 55 धावांत 5 तर अझाज पटेलने 60 धावांत 2 तसेच फिलीप्सने 52 धावांत 2 आणि साऊदीने 48 धावांत 1 गडी बाद केला.
न्यूझीलंडच्या डावाला लॅथम आणि कॉनवे यांनी सावध सुरूवात करुन देताना सलामीच्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. रमेश मेंडीसने कॉनवेला 17 धावावर पायचीत केले. त्यानंतर लॅथम आणि विलियमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. लॅथमने 6 चौकारांसह 70 तर विलियमसनने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 55 धावा जमविल्या. जयसुर्याने लॅथमला तर धनंजय डिसिल्वाने विलीयमसनला बाद केले. रचिन रवींद्रने 48 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा जमविल्या. डिसिल्वाने त्याचा त्रिफळा उडविला. मिचेल 1 षटकार आणि 5 चौकारांसह 41 तर ब्लंडेल 1 चौकारासह 18 धावांवर खेळत असून या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 59 धावांची भागिदारी केली. लंकेतर्फे धनंजय डिसिल्वाने 2 तर रमेश मेंडीस व जयसुर्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 91.5 षटकात सर्वबाद 305 (कमिंदु मेंडीस 114, कुशल मेंडीस 50, निशांका 27, चंडीमल 36, डिसिल्वा 11, रमेश मेंडीस 14, ओरुरकी 5-55, अझाज पटेल 2-60, फिलीप्स 2-52, साऊदी 1-48), न्यूझीलंड प. डाव 72 षटकात 4 बाद 255 (लॅथम 70, कॉनवे 17, केन विलियमसन 55, रचिन रवींद्र 39, मिचेल खेळत आहे 41, ब्लंडेल खेळत आहे 18, अवांतर 15, डिसिल्वा 2-31, रमेश मेंडीस 1-69, जयसुर्या 1-99)