यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शनची अर्धशतके
पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 4 बाद 264 धावा : ऋषभ पंतला दुखापत, शुभमन स्वस्तात बाद
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल यांची अर्धशतके आणि केएल राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी 4 गडी गमावत 264 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविंद्र जडेजा 19 तर शार्दुल ठाकूर 19 धावांवर खेळत होता. खराब प्रकाशमानामुळे पहिल्या दिवशीचा खेळ 83 षटकांचा झाला.
प्रारंभी, नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला शानदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 94 धावांची सलामी देताना एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. या दोघांनी पहिले सत्र खेळून काढताना इंग्लंडला फारसे यश मिळू दिले नाही. लंचब्रेकनंतर मात्र काही वेळातच केएल राहुलला 30 व्या षटकात ख्रिस वोक्सने तंबूचा रस्ता दाखवल. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असणारा केएल 4 चौकारासह 46 धावा काढून बाद झाला.
केएल बाद झाल्यानंतर जैस्वालने साई सुदर्शनला सोबतीला संघाचा डाव पुढे नेला. यादरम्यान जैस्वालने शानदार अर्धशतक झळकावले. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच जैस्वालला डॉसनने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. जैस्वालने 107 चेंडूचा सामना करताना 10 चौकार आणि 1 षटकारासह 58 धावा केल्या. जैस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. चहापानाआधी त्याला कर्णधार स्टोक्सने माघारी धाडले. गिलने 12 धावा केल्या. दुसरीकडे, साई सुदर्शनने ऋषभ पंतला सोबतीला घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने 72 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी साकारताना त्याने 7 चौकारासह 61 धावा फटकावल्या. पंतला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले. यानंतर दिवसअखेरीस जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजा 19 तर शार्दुलही 19 धावांवर खेळत होता. इंग्लंडकडून बेन स्टोक्से 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 83 षटकांत 4 बाद 264 (यशस्वी जैस्वाल 58, केएल राहुल 46, साई सुदर्शन 61, शुभमन गिल 12, ऋषभ पंत रिटायर्ड 37, जडेजा खेळत आहे 19, शार्दुल ठाकूर खेळत आहे 19, बेन स्टोक्स 2 बळी, जोफ्रा आर्चर, लियॉम डॉसन प्रत्येकी 1 बळी).
युवा गोलंदाज अंशुल कंबोजचे कसोटी पदार्पण
मँचेस्टर टेस्टमध्ये अंशुल कंबोजला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तो काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये पोहोचला होता, आणि लगेचच त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 स्थान मिळाले. माजी विकेटकीपर फलंदाज दीप दासगुप्ता यांनी अंशुलला त्याची टेस्ट कॅप दिली आणि तो भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळणारा 318 वा खेळाडू ठरला. अंशुलचा घरेलू क्रिकेटमधला डेब्यू 2022 साली झाला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 10 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या आणि आपली छाप पाडली. या कामगिरीच्या जोरावर त्याला 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघात संधी मिळाली. अंशुलला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. तो इंडिया ए संघासोबत इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन फर्स्ट क्लास सामने खेळला होता, जिथे त्याने 5 विकेट्स घेतल्या. आता, टीम इंडियात स्थान मिळाल्याने त्याची कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
केएलचा आणखी एक पराक्रम
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने या सामन्यात 11 धावा करून एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याने इंग्लंडमध्ये 1,000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत आणि असे करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने 17 सामन्यात 1575 धावा केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
सचिन तेंडुलकर - 1,575 धावा
राहुल द्रविड - 1,376 धावा
सुनील गावसकर - 1,152 धावा
विराट कोहली - 1,096 धावा
केएल राहुल - 1,008 धावा
जैस्वालचा आणखी एक कारनामा
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत यशस्वी जैस्वालने असा एक विक्रम रचला, जो आतापर्यंत कोणालाही करता आला नव्हता. मँचेस्टरच्या मैदानात आतापर्यंत या मैदानात भारताच्या एकाही सलामीवीराला कधीच अर्धशतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे या मँचेस्टरच्या मैदानात अर्धशतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला आहे. त्याने या सामन्यात 10 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 58 धावांची दमदार खेळी साकारली.
पंतला गंभीर दुखापत
चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. संघाचा प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे निवृत्त (रिटायर्ड हर्ट) झाला. त्याने 48 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या होत्या. ही घटना भारताच्या डावातील 68 व्या षटकात घडली. ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर बॉल सरळ पंतच्या पायावर आदळला. चेंडू लागताच पंत वेदनेत ओरडला. संघाचा फिजिओ मैदानात धावत आला. त्याने पंतचे बूट काढून पाहिले असता, उजव्या पायाच्या लहान बोटातून रक्त येत असल्याचे आणि पाय सुजल्याचे दिसून आले.