रहाणे, अय्यर, खान यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ लखनऊ
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या इराणी करंडक सामन्यात मुंबईने शेष भारत संघाविरूद्ध पहिल्या डावात 4 बाद 237 धावा जमविल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सर्फराज खान यांनी अर्धशकते झळकविली. या सामन्यात शेष भारताने नाणेफेक जिंकून रणजी विजेत्या मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. शेष भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईचे पहिले तीन फलंदाज केवळ 37 धावात बाद केले. डावाला प्रारंभ झाल्यानंतर तिसऱ्या षटकात मुकेश कुमारने पृथ्वी शाँला 4 धावावर झेलबाद केले. त्यानंतर त्याने या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक तेमोरेला खाते उघडण्यापूर्वीच बाद केले. आयुष म्हात्रेने मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 35 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यानी चौथ्या गड्यासाठी 102 धावांची शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अय्यरने 84 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 57 धावा जमविल्या. यश दयालने अय्यरला झेलबाद केले. एका बाजुने कर्णधार रहाणे सावध फलंदाजी करत होता. त्याला सर्फराज खानकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 98 धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणे 1 षटकार आणि 6 चौकारांसह 86 तर सर्फराज खान 6 चौकारांसह 54 धावावर खेळत आहेत. शेष भारतातर्फे मुकेश कुमारने 60 धावात 3 तर दयालने 46 धावात 1 गडीबाद केला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव 68 षटकात 4 बाद 237 (रहाणे खेळत आहे. 86 सर्फराज खान खेळत आहे 54, श्रेयस अय्यर 57, म्हात्रे 19, शाँ 4, अवांतर 17, मुकेश कुमार 3-60, दयाल 1-46).