धूल, दोसेजा यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटात सुरू असलेल्या दिल्ली आणि हिमाचलप्रदेश यांच्यातील सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दिल्लीने हिमाचलप्रदेशवर 329 धावांची आघाडी मिळविली आहे. दिल्ली संघातील यश धूल आणि आयुष दोसेजा यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
या सामन्यात दिल्लीने पहिल्या डावात 430 धावा जमविल्यानंतर हिमाचलप्रदेशचा पहिला डाव 297 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीने पहिल्या डावात 133 धावांची आघाडी मिळविली. हिमाचल प्रदेशच्या पहिल्या डावात पुरोहितने 70 धावा केल्या तर दिल्लीच्या सैनीने 52 धावांत 3 गडी बाद केले. दिल्लीने दिवसअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 196 धावा जमवित हिमाचलप्रदेशवर एकूण 329 धावांची आघाडी मिळविली. यश धूलने 59 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारासह जलद 70 धावा तर दोसेजाने 8 चौकारांसह नाबाद 62 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली प. डाव 430, हिमाचलप्रदेश प. डाव 297, दिल्ली दु. डाव 4 बाद 196 (धूल 70, दोसेजा खेळत आहे 62).