अखिल, मुशीर, सिद्धेश यांची अर्धशतके
पुडुचेरीविरुद्ध मुंबईच्या 3 बाद 317 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरू झालेल्या रणजी करंडक इलाईट ड गटातील सामन्याच्या पहिल्या दिवशी पुडुचेरीविरुद्ध खेळताना यजमान मुंबईने मुशीर खान, अखिल हेरवाडकर व सिद्धेश लाड यांच्या अर्धशतकांच्या बळावर पहिल्या दिवशीअखेर 3 बाद 317 धावा जमविल्या.
पुडुचेरीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. आयुष म्हात्रे व मुशीर खान यांनी मुंबईला बऱ्यापैकी सुरुवात करून देताना 54 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. 11 व्या षटकात आक्रमक खेळणाऱ्या म्हात्रेला 35 धावांवर अबिन मॅथ्यूने बाद केले. त्याने 34 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार मारले. मुशीरला नंतर अखिल हेरवाडकरकडून चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 119 धावांची भागीदारी करीत संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. मुशीर खानला सभय छ•ाने संतोष रत्नपारखेकरवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. मुशीरने 102 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 84 धावा काढल्या.
हेरवाडकरला नंतर अनुभवी सिद्धेश लाडने चांगली देत अर्धशतक झळकवले. या दोघांनी मुंबईची स्थिती आणखी मजबूत करताना 64 धावांची भागीदारी केली. हेरवाडकर शतक झळकवणार असे वाटत असतानाच सागर उदेशीने त्याला पायचीत करून त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने 188 चेंडूत 11 चौकारांसह 86 धावा जमविल्या. सिद्धेश व सरफराझ खान यांनी उर्वरित वेळ खेळून काढत आणखी 80 धावांची भर घातली आणि संघाला तीनशेची मजल मारून दिली. दिवसअखेर सरफराझ 29 व सिद्धेश 80 धावांवर खेळत होते. पुडुचेरीच्या मॅथ्यू, सभय व उदेशी यांनी एकेक बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प.डाव 84 षटकांत 3 बाद 317 : आयुष म्हात्रे 34 चेंडूत 35, मुशीर खान 102 चेंडूत 84, अखिल हेरवाडकर 86, सिद्धेश लाड खेळत आहे 80, सरफराझ खान खेळत आहे 29, मॅथ्यू 1-63, सभय छ•ा 1-65, सागर उदेशी 1-77.