हवाई दलासाठी ‘एचएएल’ला 97 लढाऊ विमानांची ऑर्डर
संरक्षण मंत्रालयाकडून 65,000 कोटी ऊपयांची निविदा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या लष्करी क्षमतेला बळ देण्याच्यादृष्टीने संरक्षण मंत्रालयाने सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) 97 लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 65,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची निविदा जारी केली आहे. ही मेड इन इंडिया ‘एलसीए मार्क 1ए’ लढाऊ विमाने असतील. भारत सरकारने स्वदेशी लष्करी हार्डवेअरसाठी दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरली आहे.
अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने एचएएलला एक निविदा जारी केली असून कंपनीला त्याला उत्तर देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाला मिग-21, मिग-23 आणि मिग-27 फ्लीट बदलण्यास मदत होईल. स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रम संरक्षण व्यवसायाशी संबंधित लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी निर्माण करेल. केंद्र सरकारचा हा निर्णय संरक्षण मंत्रालय आणि हवाई मुख्यालय यांच्याद्वारे पूर्णत: समर्थित स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रम स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून देशभरातील संरक्षण व्यवसायात गुंतलेल्या लहान आणि मध्यम उद्योगांना मोठा व्यवसाय देण्यासाठी चालना मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एचएएल’ मजबूत करण्यावर भर दिला आहे. एचएएलला सध्याच्या सरकारकडून स्वदेशी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि त्यांची इंजिने तयार करण्याचे आदेश मिळाले आहेत. यापूर्वी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी स्पेनला 97 एलसीए मार्क 1ए लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या योजनेची माहिती दिली होती. ‘एलसीए मार्क 1ए’साठी पूर्वीची ऑर्डर 83 विमानांसाठी होती. यातील पहिली बॅच काही आठवड्यांत वितरित केली जाणार आहे. लष्कराला 100 क्षेपणास्त्रांसह रशियन बनावटीच्या इग्ला-एस मॅन पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणालीची पहिली तुकडी मिळाली आहे. हा एका मोठ्या कराराचा भाग असून त्यामध्ये देशातील त्यांच्या उत्पादनाचा समावेश आहे.