केसांचे संग्रहालय
अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात, हे आपल्याला माहिती आहे. कोणाला नाणी जमविण्याचा, कोणाला पिसे जमविण्याचा तर कोणाला बसची तिकिटे जमाविण्याचाही छंद असू शकतो. तथापि, केस जमविण्याचा छंद काही निराळाच आहे. अमेरिकेतील एक केषभूषाकार लीला कहून यांनी हा छंद जोपासला असून त्यांनी या केसांचे एक वस्तूसंग्रहालयही बनविले आहे. या वस्तूसंग्रहालयाचा प्रारंभ 1956 मध्ये करण्यात आला होता. या संग्रहालयातील केस हे सर्वसामान्यांचे नसून महनीय व्यक्तींचे आहेत. या महनीय आणि जगद्विख्यात व्यक्तींच्या केसांपासून बनविलेल्या विविध वस्तू आणि रचनाही या वस्तूसंग्रहालयात साठविल्या आहेत.
या संग्रहालयात कोणाकोणाचे केस आहेत, ते समजल्यावर आपल्याला आश्चर्य वाटणार आहे. येथे विश्वविख्यात दिवंगत अभिनेत्री मर्लीन मन्रो, अमेरिकेचे अनेक दिवंगत अध्यक्ष यांच्यासह 3 हजारांहून अधिक व्यक्तींचे केस ठेवण्यात आले आहेत. या केसांच्या सुंदर कलाकृतीही दर्शकांना पहावयास मिळतात, अमेरिकेतील मिसुरी येथे हे संग्रहालय आहे. 1955 मध्ये लीला कहून यांच्या दृष्टीस केसांनी बनविलेली एक फुलासारखी सुंदर रचना पडली. त्यावरुन त्यांच्या मनात केसांचे आणि केसांपासून बनविलेल्या कलाकृतींचे एक वस्तूसंग्रहालय स्थापन करावे, अशी कल्पना चमकली. त्यांनी 1956 पासून ती प्रत्यक्षात उतरविण्यास प्रारंभ केला आहे. अनेक महनीय व्यक्तींच्या केसांपासून बनविण्यात आलेले हार, मनगटी घड्याळांचे पट्टे आणि गुच्छ तसेच इतर कलाकृती या संग्रहालयात आहेत. हे संग्रहालय पाहण्यासाठी प्रतिदिन नागरीकांची गर्दी असते. अमेरिकेत येणारे विदेशी पर्यटकही हे वस्तूसंग्रहालय आवर्जून बघावयास येतात. दिवसेंदिवस या संग्रहालयातील महनीय व्यक्तींच्या केसांच्या कलाकृतींची संख्या वाढतच आहे.