वयाच्या 12 व्या वर्षी कापावा लागला पाय, आता फॅशन स्टार
कॅन्सरची झाली होती लागण
जीवन नेहमीच एकसारखे नसते, जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांचे बालपण संघर्षमय राहिले आहे. युवा यूलि यांग सेलीनची कहाणी देखील अशीच आहे. वयाच्या 12 व्या वर्षी तिला कॅन्सरमुळे एक पाय गमवावा लागला होता, त्यावेळी निराशा आणि भीती मनात घर करून होती, परंतु त्यावर मात करत आता वयाच्या 23 व्या वर्षी तिची हिंमत आणि फॅशन स्टाइल जगाला प्रेरित करणारी आहे.
यूलियांग चीनच्या ग्रामीण भागात राहते. वयाच्या 12 व्या वर्षी तिला ऑस्टियोसारकोमा झाला, हा हाडांचा कॅन्सर होता, तिच्या डाव्या पायात वेदना व्हायच्या. जीव वाचविण्यासाठी तिला पाय कापून घ्यावा लागला. त्यानंतर दोन वर्षापर्यंत ती शाळेत गेली नाही. लोक तिच्याकडे पाहत राहायचे, काही लोक लंगडी किंवा छोटे पाय असलेली मुलगी असे म्हणायचे. यामुळे यूलियांग घाबरू लागली आणि घरातून बाहेर पडणे टाळू लागली.
फॅशनमध्ये मिळाली ओळख
परंतु विद्यापीठात गोष्टी बदलल्या, तिला तेथे स्वातंत्र्य मिळाले. ती आता कायद्याचे शिक्षण घेत आहे. तिने स्वत:ची ओळख निर्माण केली असून अता ती एक फॅशन स्टेटमेंट आहे. टिकटॉकवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती वेगवेगळी स्टाइल अवलंबित असते. कधी लोलिता लेस, कधी जपानी स्ट्रीटवेअर, कधी गोथिक लुकचा ती स्वीकार करते. मला कुठलीही एकच स्टाइल पसंत नाही. मी सर्व गोष्टी आजमावून पाहते. जेके स्कूलगर्ल, जपानी, कोरियन, क्यूट, गोथ जे चांगले वाटते ते परिधान करते. प्रत्येक आउटफिटचे स्वत:चे आकर्षण असल्याचे यूलियांग सांगते.
बालपणापासून कपड्यांचा छंद
यूलियांगला इयत्ता पाचवीपासून कपड्यांची आवड होती. सुंदर कपडे मला शक्ती देतात असे ती सांगते. विद्यापीठात तिने फॅशनसोबत प्रयोग सुरू केला. तिने फॅशनचे कुठलेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही. ती स्वत:हून गोष्टी आत्मसात करते. मला अजून खूप काही शिकायचे आहे, एकेदिवशी कपडे डिझाइन करण्याची माझी इच्छा असल्याचे यूलियांगचे सांगणे आहे.
प्रेम अन् द्वेष
टिकटॉकवर तिचे लाखो चाहते असुन लोक तिची स्टाइल आणि हिमतीचे कौतुक करतात. परंतु सोशल मीडियावर द्वेष देखील मिळतो. काही लोक तिच्या शरीराची टिंगल करतात. सोशल मीडिया दुहेरी तलवार असून काही कॉमेंट्स अत्यंत दु:ख देतात असे ती सांगते. तर तिचे प्रशंसक तिच्या हिमतीने प्रेरित होतात. जर कुणी माझ्या व्हिडिओने प्रेरित होत असेल तर मला आनंद होतो असे तिने म्हटले आहे.