एच. डी. रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी
बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात रवानगी : कैदी नं. 4567
बेंगळूर : पीडित महिलेल्या अपहरण प्रकरणी आरोप असलेल्या माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्या 5 दिवसांच्या एसआयटी कोठडीची मुदत बुधवारी संपत असल्याने न्यायालयाने त्यांना 14 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात करण्यात आली असून त्यांना कैदी क्र. 4567 देण्यात आला आहे. खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावरील कथित लैंगिक शोषण प्रकरणात एच. डी. रेवण्णा यांच्यावरही आरोप आहे. रेवण्णा यांनी पीडित महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना शनिवार 4 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना पाच दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. ही मुदत संपलयाने एसआयटीने त्यांना बेंगळूरच्या 17 व्या एसीएमएम न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. न्यायालयीन कोठडीचा आदेशानंतर कोर्ट हॉलमधून बाहेर पडताना रेवण्णा यांना अश्रु अनावर झाले.
जामीन याचिकेवर आज निर्णय?
अटकेनंतर रेवण्णा यांनी सोमवारी त्यांनी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. न्यायाधीश संतोष भट यांनी सुनावणी एक दिवस पुढे ढलकली. त्यामुळे रेवण्णांच्या जामिनावर गुरुवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी रेवण्णांना आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली. यासाठी एसआयटीने रिमांड अर्ज दाखल केला. यावर रेवण्णांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. एसआयटीने दिलेल्या अहवालात रेवण्णांनी चौकशीला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचा उल्लेख आहे. मौन बाळगणे हा देखील व्यक्तीचा अधिकार आहे, असा युक्तिवाद केला. यावेळी विशेष सरकारी वकिलांनी हस्तक्षेप करत जामीन न देता न्यायालयीन कोठडीत आरोपीची रवानगी करण्याची विनंती केली. त्यावर रेवण्णांच्या वकिलांनी आक्षेप घेता. तेव्हा एसआयटीच्या वकिलांनी आरोपीला जामीन मिळाल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. वाद-युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी रेवण्णा यांना, तुम्हाला पोलिसांकडून त्रास दिला जात आहे का?, असा प्रश्न केला. त्यावर रेवण्णा यांनी एसआयटीच्या कोठडीत येऊन तीन दिवस झाले आहेत. गोळ्या घेण्यासाठी विलंब होत आहे. अधिकारी विनाकारण त्रास देत आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे महिला माहित नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे, असे सांगितले. तीन दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जावणत आहे. पुरेशी झोप घेणेही शक्य झाले नाही. सर्व चौकशी झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले होते. मात्र, आज पुन्हा चौकशी करणार असल्याचे सांगत आहेत. मी चूकच केली नाही तर कबुली कशाची देणार?, जाणीवरपूर्वक मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दोन वकिलांची नेमणूक
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) न्यायालयात हजर राहण्यासाठी आणि खटले चालवण्यासाठी ज्येष्ठ वकील अशोक नाईक श्रीमती जयाना कोठारी यांची अतिरिक्त विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी यासंबंधीचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.