एसआयटीकडून एच.डी. रेवण्णांची कसून चौकशी
अनेक प्रश्न विचारून माहिती मिळविण्याचे काम : प्रकरणातील दुसऱ्या आरोपीलाही अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
महिलेच्या अपहरणप्रकरणी शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आलेल्या आमदार एच. डी. रेवण्णाची रविवारी एसआयटीने सीआयडीच्या एसआयटी कार्यालयात संपूर्ण रात्रभर सखोल चौकशी करण्यात आली. या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न विचारून माहिती गोळा केली जात आहे. म्हैसूर जिल्ह्याच्या के. आर. शहर पोलीस स्थानकात दाखल झालेल्या महिलेच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी महिलेचे अपहरण का केले? अपहरण करून त्यांना कुठे ठेवले होते? त्या महिलेवर हल्ला झाला का, असे विविध प्रश्न रेवण्णांना विचारण्यात आले आहेत.
याच प्रकरणातील दुसरा आरोपी सतीश बाबू याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. होळेनरसीपूर शहर पोलिसांत दाखल झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर रेवण्णांकडून बरीच माहिती मिळत आहे. तुम्ही या महिलेला किती दिवसांपासून ओळखता? भवानी रेवण्णा घरात नसताना तिच्यावर स्टोअरऊम आणि किचनमध्ये लैंगिक अत्याचार झाला होता का? यासह अनेक प्रश्न विचारून एसआयटीने सखोल तपास केला आहे.
आज न्यायाधीशांसमोर हजर करण्याची शक्यता
तुमचा मुलगा खासदार प्रज्ज्वल रेवण्णा कुठे राहत होता? त्यांनी केलेल्या कृत्याची तुम्हाला माहिती नव्हती का? निवडणुकीदरम्यान पेनड्राइव्हच्या वाटपाची माहिती नव्हती का, असे विविध प्रश्न एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी रेवण्णा यांना विचारले. खासदारांचा कारचालक कार्तिकने नोकरी सोडण्याचे कारण काय, त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता का? त्याबाबतही एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. रेवण्णा यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली असली तरी अजून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत, असे सांगितले जात आहे. एसआयटीच्या कोठडीत असलेल्या रेवण्णा यांना आज न्यायाधीशांसमोर हजर केले जाण्याची शक्मयता आहे.
भवानी रेवण्णाही अडचणीत
महिलेच्या अपहरण प्रकरणात माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी भवानी रेवण्णाही अडचणीत सापडल्या आहेत. महिलेच्या अपहरणप्रकरणी महिलेच्या मुलाने के.आर. नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत भवानी रेवण्णा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने भवानी यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत भवानी यांना नोटीस बजावून त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्मयता आहे.
आपल्याविरोधात राजकीय षड्यंत्र : एच. डी. रेवण्णा
महिलेच्या अपहरणप्रकरणी एसआयटी पथकाने अटक केलेल्या माजी मंत्री एचडी रेवण्णा यांनी रविवारी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या विरोधात राजकीय षड्यंत्र सुरू असल्याचे सांगितले. बोअरिंग हॉस्पिटलजवळ पत्रकारांशी ते बोलत बोलताना ते म्हणाले, माझ्या 40 वर्षांच्या राजकारणात कोणतेही आरोप झाले नाहीत. हे राजकीय षडयंत्र आहे.