एच वन व्हिसा विरोधक राजीनामा देणार
वॉशिंग्टन डीसी :
अमेरिकेत जाऊन काम करण्यासाठी उपयोगात आणला जाणारा एच वन बी व्हिसा हा पूर्णत: बंद करुन टाकावा, अशी मागणी करणाऱ्या अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी मर्जोरी टेलर ग्रीनी या त्यागपत्र देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्या कट्टर ट्रंप समर्थक मानल्या जातात. तथापि, ट्रंप यांनी त्यांची एच वन बी व्हिसा प्रद्धती रद्द करण्याची मागणी स्वीकारलेली नाही. उलट, अमेरिकेला विदेशांमधील प्रतिभावंतांची आवश्यकता आहे. त्यामुळे एच वन बी व्हिसा पद्धती आम्ही बंद करणार नाही, असे विधान त्यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे ते या व्हिसा पद्धतीच्या विरोधात नाहीत, हे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे ट्रंप यांच्याशी मतभेद झाल्याने ग्रीनी यांनी आपल्या प्रतिनिधित्वाचे त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आहे. ग्रीनी या अमेरिकेच्या काँग्रेसमधील सदस्य रिपब्लिकन पक्षाच्याच सदस्या असून आपण आपल्या विचारांवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आपण त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतलेला असून लवकरच त्यागपत्र दिले जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.