बेतीत आढळला गुरूप्रसाद राणेचा मृतदेह
कारवार खूनाला कलाटणी मिळाल्याने वाढले गूढ : चौकोनी प्रेमप्रकरणामुळे सध्या दोन कुटुंबे उद्ध्वस्त
पणजी : पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय 52) यांचा कारवार तालुक्यातील हणकोण येथे गेल्या रविवारी खून झाला होता. या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कारवारचे पोलीस मंगळवारी पणजीत दाखल झालेले असतानाच या खून प्रकरणातील संशयित गुऊप्रसाद राणे याचा मृतदेह काल बुधवारी बेती येथे सापडल्याने या खून प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. प्रेम प्रकरणाच्या ‘चौकोनातून’ उद्योगपती विनायक नाईक यांचा खून सुपारी देऊन झाला होता, हे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. त्याच दिशेने धागेदोरे मिळवत कारवार पोलिसांची संशयाची सुई फोंड्यातील गुऊप्रसाद राणे यांच्यापर्यंत गेली होती. परंतु काल मांडवी नदी पात्रातील बेती येथे पुलाखालील परिसरात गुऊप्रसाद राणे यांचा मृतदेह पाण्यात आढळल्याने ही आत्महत्त्या, घातपात की या प्रकरणातील दुसरा खून? याचे गूढ वाढले आहे.
बेतीत सापडला राणेचा मृतदेह
बेती येथील जुन्या फेरीबोट धक्क्याजवळ आढळून आलेला मृतदेह फोंड्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गुरूप्रसाद राणे यांचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या मतृदेहासोबत गुरूप्रसाद राणे यांचे ओळखपत्र सापडले आहे. त्याच्या कुटुंबियांनीही मृतदेहाच्या ओळखीची पुष्टी दिली आहे. गुऊप्रसाद राणे याचा कारवारमधील उद्योजकाच्या हत्येत सहभाग असल्याचा संशय असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी राणे यांच्या पत्नीला बोलवले होते. तिनेही मृतदेहाची ओळख केली आहे.
आणखी कोण कोण आहेत गुंतलेले?
कारवार पोलीस उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक याच्या हत्येप्रकरणात संशयित म्हणून फोंड्याचे गुरूप्रसाद राणे यांचा शोध घेत असतानाच त्यांचा मृतदेह पाण्यात आढळल्याने नेमका हा शोध तपास कोणत्या दिशेने जातो, याबाबत गूढ वाढले आहे. कारण कारवारचे पोलीस अधीक्षक के. नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गोव्यात आले आहे. आता राणे यांचाच मृतदेह आढळल्याने नेमके या प्रकरणात आणखी कोण कोण आहेत, त्यादिशेने हा तपास पोलीस करण्याच्या तयारीत आहेत.
प्रेमाच्या चौकोनातून सुपारी देऊन राणे यांनी उद्योगपती विनायक नाईक यांचा खून केल्याचा प्राथमिक अंकाज सदाशिवगड पोलिसांनी व्यक्त केला होता. हत्या करण्यात आलेले विनायक नाईक हे मूळ हणकोण येथील रहिवासी होते. त्यांचा गुरूप्रसाद राणे यांनी या व्यावसायिकाने नेपाळी कामगारांना सुपारी देऊन खून केला होता, असे या हत्येच्या घटनेत अटक केलेल्या संशयितांनी कबूल केलेले आहे. मुळात उद्योगपती विनायक व फोंड्याचे गुरूप्रसाद राणे ह्या दोघांचीही पूर्वीपासून ओळख होती. दोघेही व्यवसायात लखपती बनले होते. परंतु अनैतिक संबंधामुळे उद्योगपती नाईक याचा खून झाला होता.
ज्या ठिकाणी उद्योगपती विनायक नाईक यांच्या खुनाचा प्रकार घडला होता. त्या जवळ असलेल्या एका बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला होता. हल्लेकोर कारमधून पसार झाले होते. कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला असता. ही कार गोव्यातील लोलये-काणकोण येथील असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर कारमालकाकडे अधिक चौकशी केली असता, ही कार फोंड्यातील व्यावसायिक गुरूप्रसाद राणे याने भाडेपट्टीवर घेतल्याचेही स्पष्ट झाले होते.
दोन नेपाळींना म्हापशात अटक
कारवार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करताना हल्लेखोर कामगारांना मंगळवारी म्हापसा येथून अटक केली होती. हे दोघेही संशयित कामगार नेपाळी आहेत. हे गुरूप्रसादकडे कामाला होते. त्यांनाच राणे यांनी सुपारी देऊन उद्योगपती नाईक यांची हत्या केल्याचे तपासात स्पषट झाले आहे. या संशयितांकडून आणखी काही माहिती मिळते का आणि या प्रकरणात कितीजणांचा सहभाग आहे, त्यादिशेने पोलीस तपास करीत आहेत.
एका गुन्ह्याने होत्याचे नव्हते केले !
पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या गुऊप्रसाद राणे याचाही गूढरित्या मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह काल बुधवारी बेती जेटीजवळ आढळून आल्यानंतर फोंडा परिसरात एकच चर्चा सुरु झाली. बेतोडा फोंडा येथील मॅकडॉवेल कंपनीत केमिस्ट ते यशस्वी उद्योजक असा राणे याचा अचंबित करणाऱ्या प्रवासाचा अंत त्याच्या सहस्यमय मृत्युने झाला.
गुऊप्रसाद राणे याचे गेल्या पस्तीस वर्षांपासून फोंडा येथे वास्तव्य होते. फोंडा शहरातील खडपाबांध येथे त्याचा अलिशान बंगला असून पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे हे सुखवस्तू कुटुंब. साधारण पस्तीस वर्षांपूर्वी मोजक्याच गरजेच्या वस्तू घेऊन हळगा-कारवार या आपल्या मूळ गावातून फोंड्यात आलेल्या राणे याने बेतोडा येथील मॅकडॉवेल कंपनीत साधा कॅमिस्ट म्हणून चरितार्थ सुऊ केला. आज एक यशस्वी उद्योजक म्हणून त्याने मजल मारली होती. गोव्यातील महनीय व्यक्तींबरोबरच पोलीस व अन्य सरकारी अधिकाऱ्यांशीही जवळचे संबंध प्रस्तापित केले होते. मात्र या खुनाच्या घटनेने जीवन तर संपविलेच, पण सारे कुटुंबही उद्ध्वस्त कऊन टाकले आहे.
बेतोडा येथे केमिस्ट म्हणून नोकरी मिळाल्यानंतर सुऊवातीचा काहीकाळ आडपई येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. कामाला लागून अवघ्या तिनच महिन्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला व गोवा सोडून मूळ गावात जाण्याचा त्यांचा बेत होता. पण फोंड्यातील काही लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी आपला विचार बदलला व नोकरी कायम केली. पुढे उसगाव येथे एका खासगी कंपनीचा युनिट त्यांनी चालवायला घेतला. त्यात जम बसल्याने महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट हे आस्थापन सुऊ केले. अन्य एकदोन कंपन्यांची कामेही आऊटसोर्सवर घेतली. मडकई येथे मद्य उत्पादक कंपनी तसेच शिरोडा येथे पावडर कोटिंग आस्थापन अशी उद्योग क्षेत्रात चढत्या क्रमाने मजल मारली.
मयत राणे यांचा विवाह गोव्यातच झाला. त्याची पत्नी भारत सरकारच्या न्युट्रिशन बोर्डमध्ये अधिकारी असल्याने तिची नोकरी मुंबईत होती. हल्लीच हे मंडळ बरखास्त कऊन दुसऱ्या एका खात्यात विलीन केल्याने तिची पणजीत बदली झाली होती. मोठी मुलगी कामाला लागल्याने व दुसरी शिकत असल्याने पणजी व फोंडा या दोन्ही ठिकाणी सोयिनुसार त्यांचे वास्तव्य असायचे. धाकटा मुलगाही चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी महिन्याभरापूर्वीच पुण्याला दाखल झाला आहे. कौटुंबिक स्थिरता,आर्थिक सुबत्ता व उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचाल असे सर्वकाही सुस्थितीत चाललेले असताना राणेला ही उपरती का झाली असावी? गुन्हेगारी मार्गाने जाण्याचे टोकाचे पाऊल त्याने का उचलले ? हा प्रश्न त्याच्या निकटवर्ती व मित्रपरिवाराला पडला आहे. एका खुनाच्या घटनेने दोन जीवांचा अंत व दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत हे मात्र खरे...!