महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मोक्षावरील गुरुभक्तीअध्याय एकोणतिसावा

06:09 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मला मोक्षप्राप्तीनंतरची भक्ती हवी आहे, असा लकडा भगवंताच्या मागे उद्धवाने लावला होता. त्यासाठी काय वाट्टेल ते करायची त्याची तयारी होती. एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत जाऊन त्याने देवांना लोटांगण घातले आणि त्यांचे दोन्ही पाय घट्ट पकडले. त्याचे मागणे आणि कृती पाहून भगवंत संतुष्ट झाले आणि त्यांना त्याच्याबद्दलच्या प्रेमाचे भरते आले. मोक्षापेक्षा श्रेष्ठ असलेली गुरुभक्ती नाना युक्त्या योजून उद्धव मागत होता. एका श्रेष्ठ भक्ताचे हे मागणे पाहून श्रीपती अत्यंत सुखावला. आनंदाने डोलू लागला. त्या स्वानंदस्थितीतच अतिशय संतोष पावलेल्या श्रीकृष्णनाथाने मुक्तीनंतरची भक्ति उद्धवाला अर्पण केली. इतर कुणी भक्ताने असे मागणे मागितले असते तर भगवंतांनी ते सहजासहजी मान्य केले नसते पण उद्धवाची गोष्टच वेगळी होती. त्याचे पुण्य अत्यंत शुद्ध होते. त्यामुळे त्याच्यासारखा धन्य तोच होता. म्हणून भगवंतांनी त्याचे म्हणणे मान्य करून त्याला हवी असलेली मुक्तीनंतरची भक्ती प्रदान केली. आत्तापर्यंत भगवंतांनी केलेल्या उपदेशानुसार सद्गुरू आणि ब्रह्म हे वेगवेगळे नाहीतच. त्यामुळे मोक्षावरील गुरुभजन करणे म्हणजे एकप्रकारे ब्रह्मभक्ती केल्यासारखेच आहे. त्यामुळे मोक्षावरील गुरुभक्ती मागणे हे मुळीच चुकीचे नाही. भगवंतांकडून मुक्तीनंतरही भक्ती करण्याचे वरदान मिळाल्यामुळे उद्धवाची थोर ख्याती झाली, मोठी प्रसिद्धी झाली. त्याने मागणेच असे अगम्य मागितले होते की, असे काही मागावे असे ह्या पूर्वी कुणा भक्ताच्या मनातही आलेले नव्हते. भगवंत उद्धवाच्या वर प्रसन्न होतेच त्यात पुन्हा त्याने भक्तीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केल्याने भगवंताचा तो अगदी लाडका झाला आणि त्याची मागणी त्यांनी सहजी मान्य केली. पुढे ते म्हणाले, उद्धवा, जे मुक्तीनंतरही माझी भक्ती करत असतात त्यांना माझ्या अवतारात जी शक्ती मी धारण करतो त्या शक्तीची शक्ती प्राप्त होते. आता अवतारात माझी शक्ती केव्हढी असते हे मी तुला वेगळे सांगायला नको. उत्पत्ती-स्थिती-प्रलय हे सर्व घडवून मी आणतो परंतु त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त असतो. म्हणून कर्मे करून मी अकर्ता किंवा भोग भोगून अभोक्ता असतो हे लक्षात घे. हे कर्मात किंवा भोगात न गुंतणे मला माझ्या अवतारातील शक्तीमुळेच शक्य होते. कर्म करून अकर्ता राहणे किंवा भोग भोगून अभोक्ता राहणे हे ज्यांना जमत नाही त्यांना संसार दुख:रूप वाटतो. माझ्यापाशी मात्र ही शक्ती असल्याने मला संसार सुखरूप वाटतो. हे ज्याप्रमाणे मला अखंडपणे जमते तसेच ते सदाशिवानाही जमते. मुक्तीनंतरच्या भक्तीमुळे मिळणारी शक्ती तर माझ्या अवतारातील शक्तीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असते म्हणजे तिची ताकद किती असेल हे तुझ्या सहजी लक्षात येईल. ह्याप्रमाणे श्रीकृष्णाने गुप्त गोष्ट सांगितली. उद्धवाच्याही ती गोष्ट पूर्णपणे लक्षात आली. खरं म्हणजे मुक्तीनंतर भक्ती करण्याची इच्छा त्याने भक्तीपोटी मागितली होती परंतु त्यामागे एव्हढी शक्ती दडली असेल ह्याची त्याला कल्पनाही नव्हती. जेव्हा त्याला हे समजले तेव्हा त्याचा आनंद पोटात मावेना. स्वानंदाने तो कोंदाटून गेला. जेव्हा एखादे लहान मूल आईकडे तिचा सोन्याचा हार मागते तेव्हा त्याचा हट्ट पुरवायचा म्हणून ती त्याला तो घालायला देते, तसेच काहीवेळा मुले वडिलांकडे त्यांचे घड्याळ घालायला मागतात आणि वडीलही मोठ्या प्रेमाने ते त्याला घालायला देतात. त्याप्रमाणे उद्धवाला श्रीकृष्णांनी अवतारस्थिती प्राप्त करून द्यायचे ठरवले. काही वेळा ज्ञानेंद्रीये मनाचे ऐकत नाहीत मग ती ऐकू नये ते ऐकतात, बघू नये ते बघतात त्याप्रमाणे भगवंतांनी उद्धवाला अवतारस्थिती कुणाचेही न ऐकता द्यायचीच असे ठरवले होते. त्यामुळे ही गोष्ट ब्रह्मवेत्त्यांनाही कळली नाही की, वेदांची रचना करणाऱ्यांच्याही लक्षात आली नाही.

Advertisement

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article