For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरु परमात्मा परेषु

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुरु परमात्मा परेषु
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणतात, त्यांनी उपदेश केलेल्या कर्मयोगाचा जे आनादर करतात ते अमंगल विचारांनी घेरलेले असतात. ते सदैव अमंगलाचेच चिंतन करतात. ते माझ्या विचारांची पायमल्ली करतात, माझा मत्सर करतात ते महामुर्ख असतात. त्यांनी जाणूनबुजून माझ्याशी शत्रुत्व पुकारलेले असते. त्यामुळे ते नष्ट झाल्यात जमा असतात. मी सांगितल्याप्रमाणे कर्म करून ते त्याच्या फळासह मला अर्पण कर हा उपदेश त्यांना मानवत नाही. ते वेदशास्त्र शिकलेले असले तरी त्याचा उपयोग ते केवळ इतरांना शहाणपणा शिकवण्यासाठी करतात. स्वत: मात्र त्यातून काहीही बोध न घेता त्यांच्या मूळ स्वभावानुसार वागतात. स्वत:च्या स्वभावात कोणतीही सुधारणा करण्याची इच्छा नसलेली, अशी माणसे स्वत:च्या अहंकाराने व दुर्गुणांनी अधोगतीस जाऊन नाश पावतात.  बाप्पांचे बोलणे ऐकून कुणालाही असे वाटेल की, एव्हढे सर्वशक्तिमान असलेले बाप्पा अशा मूर्ख माणसांच्या बुद्धीत पालट घडवून आणून त्यांना कर्मयोगाचे आचरण का करायला लावत नाहीत. अर्थातच बाप्पांना लोकांना अशा शंका येणार हे अगोदरच माहित असल्याने ते त्यांच्या शंकेचे उत्तर पुढील श्लोकातून देत आहेत. ते म्हणतात,

तुल्यं प्रकृत्या कुरुते कर्म यज्ञानवानपि ।

Advertisement

अनुयाति च तामेवाग्रहस्तत्र मुधा मत ।। 33 ।।

अर्थ- ज्ञानी मनुष्य जरी झाला तरी त्याच्या स्वभावानुसार कर्म करतो. म्हणून त्याला तू कर्मयोगाचे आचरण कर असा आग्रह करणे व्यर्थ होय.

विवरण- बाप्पा म्हणाले, पूर्वजन्मीचे संस्कार घेऊनच माणूस जन्माला येतो. त्यानुसार त्याचा स्वभाव बनतो. त्यामुळे अमुक अमुक पद्धतीने वाग असे फारतर मी सांगू शकतो पण त्याबद्दल आग्रही राहू शकत नाही. स्वभावाच्या प्रभावानुसार सर्वजण कार्य करत असतात. एकमात्र आहे. ज्या त्रिगुणांच्या प्रभावामुळे त्याचा विशिष्ठ असा स्वभाव बनलेला असतो त्यानुसार तो कार्य करून भोग घेण्याची किंवा संग्रह करण्याची इच्छा करत असतो. त्याच त्रिगुणांच्याठायी त्याला त्या भोगांचा किंवा संग्रह केलेल्या वस्तूंचा वीट आणण्याची शक्ती असते. अर्थातच माणसाच्या स्वभावात ही वीट येण्याची प्रक्रिया फार हळू सुरु असते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊन तो भोगविषयांचा तिरस्कार करायला लागण्यासाठी आवश्यक असलेल्या कालावधीत त्याचे अनेक जन्म होऊन गेलेले असतात. पूर्वकर्मसंयोगाने जर त्यांची सद्गुरूंशी गाठ पडली तर मात्र ते त्याच्या स्वभावात त्यांच्या उपदेशामुळे ते त्याला विषयांचा कंटाळा येण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकतात. शिष्य ज्या पातळीवर असेल त्या पातळीवर उतरून ते त्याला हळूहळू त्याच्या कलाने घेत घेत त्याच्या मनात आत्मोद्धाराची ज्योत जागृत करतात.

म्हणून नाथ महाराज म्हणतात, गुरु परमात्मा परेषु... ऐसा ज्याचा दृढ विश्वासू ...देव त्याचा अंकिला स्वये संचरा त्याचे घरा एका जनार्दनी गुरुदेव... तेथे नाही बा संशय....नाथ महाराजांच्या मते सद्गुरूंचे महात्म्य एव्हढे आहे की, ते स्वत: परमात्मा, परेषु आहेत असा ज्याचा दृढविश्वास असतो त्याचे देवही अंकित होतात आणि स्वत: त्याच्या घरी येऊन त्यांची सेवा करतात. ह्यात कसलाही संशय नाही. नाथमहाराज स्वत: अशी ग्वाही देतात कारण त्यांनी स्वत: असा अनुभव घेतला होता. नाथमहाराजांचा त्यांच्या सद्गुरूंवर, श्रीजनार्दन स्वामींवर असाच दृढविश्वास असल्याने श्रीकृष्ण त्यांच्या घरी राहून पाणी भरत असे, एव्हढेच नव्हे तर पडेल ती इतर कामेही करत असे. तर असे हे देवापेक्षाही श्रेष्ठ असलेले आणि परमात्मा, परेशुच्या पंक्तीत स्थान मिळवलेले सद्गुरू मात्र त्यांच्या शिष्याच्या स्वभावात बदल करू शकतात हे निश्चित.

क्रमश:

Advertisement
Tags :

.