Solapur : सोलापूरात सतनाम वाहेगुरू’च्या जयघोषात गुरुनानक जयंती उत्सव साजरा
सोलापूरात श्री गुरुनानक देव जयंतीनिमित्त प्रवचन
सोलापूर : 'सतनाम वाहेगुरू सतनाम' च्या जयघोषात सोलापूरात सिंधी बांधवांच्या अमृतवेला ट्रस्टतर्फे ५५६ वी श्री गुरुनानकदेव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री जपजी साहेबजी आणि श्री सुखमणी साहेबजी या धार्मिक ग्रंथांचे साई गार्डन येथे भक्तीमय वातावरणात पठण करण्यात आले.
अमृतवेला ट्रस्टतर्फे अंत्रोळीकर नगरातील साई गार्डन येथे पहाटे ४.३० ते ६.३० या वेळेत उल्हासनगर येथे सुरू असलेल्या भाईसाब गुरुप्रीत सिंग रिंकू वीरजी यांच्या प्रवचनाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. ते म्हणाले, देवाचे एकत्व, सर्व मानव जातीची समानता आणि नैतिक जीवनाचे महत्त्व ही श्री गुरुनानकदेवजी यांची मुख्य शिकवण आहे. नामजप करणे, प्रामाणिकपणे जीवन जगणे आणि गरजूंना मदत करणे यावर त्यांचा भर होता. प्रेम, निस्वार्थ सेवा आणि अध्यात्मिक जीवन जगण्याची शिकवण श्री गुरुनानकदेवजी यांनी संपूर्ण जगाला दिल्याचेही भाईसाब गुरुप्रीत सिंग रिंकू वीरजी यांनी सांगितले. यानंतर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री जपजी साहेबजी आणि श्री सुखमणी साहेबजी या धार्मिक ग्रंथांच्या अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली.
याप्रसंगी शेकडो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यानंतर अमृतवेला ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या संख्येने पार पडले. यावेळी ४३जणांनी रक्तदान केले तसेच शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सहाशे गरजूंना श्री गुरुनानक देव जयंतीनिमित्त भोजन आणि सुगंधी दूध प्रसाद देण्यात आला. रात्री १०.३० वाजता उल्हासनगर येथे झालेल्या भाईसाब गुरुप्रीत सिंग रिंकू वीरजी यांच्या प्रवचनाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले.
याप्रसंगी गुरुनानक नगरचे अध्यक्ष मोहन सचदेव, लालचंद वाधवानी, शंकरलाल होतवानी, नारायण आनंदानी, धनराज आनंदानी, राजकुमार पंजवानी, जेठाभाई बहिरवानी, इंदरलाल होतवानी, हरीश कुकरेजा, विकी बलेचा, करण कुकरेजा, जगदीश खानचंदानी, मुकेश हिरानंदानी, नंदकुमार परचानी, प्रकाश परीयानी, भावेश चूग, गौरव कुकरेजा, संजय खानचंदानी, सागर धनवानी, रोहित अडवानी, चंदन रामचंदानी, दीपक धामेचा, ताराचंद परचानी, नितेश सचदेव, हरेश नानकानी, योगेश चटवानी, महेश खानचंदानी, जय गरुड आदी उपस्थित होते.