महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रणवाद्ये वाजू लागली

06:30 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणूक आता फार दूर नाही. लोकसभेची मुदतही संपत आली आहे आणि राजकीय पक्ष व इच्छुक दंड थोपटून तयारीला लागलेले दिसत आहेत. काँग्रेसने आपल्या स्थापना दिनाचे निमित्त करुन आरएसएसच्या मुख्यालयाच्या गावी नागपुरात ‘हम तय्यार है’ रॅलीचे आयोजन करत शक्तीप्रदर्शन तर केलेच पण भाजपा आणि मोदी-शहा यांना टिकेचे लक्ष करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजपा आणि शहा-मोदी 365 दिवस राजकारण एके राजकारण करत असतात. भाजपाकडून रोजच दंड थोपटले जातात. महाराष्ट्रात पंचेचाळीस आणि देशात तीनेशहून अधिक लोकसभेच्या जागा जिंकणार असे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे कार्यकर्ते सांगत आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून राज्यात रथयात्रा काढणार आहेत. प्रत्येक दिवशी तीन टोलेजंग सभा घेत ते महाराष्ट्रभूमी भाजपासाठी अनुकूल करणार आहेत. राज्यात जाहीर झालेल्या मतदार चाचण्यात भाजपा बॅकफूटवर दिसतो आहे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात जादा जागा मिळवणार असे पुढे आले आहे. तथापि चाचण्या म्हणजे निकाल नव्हे. रामलल्लांचे अयोध्येतील भव्य-दिव्य मंदिर, त्याची प्रतिष्ठापना आणि हिंदू सारा एक नारा यामध्ये या चाचण्यांचा कल उलटसुलट करण्याची ताकद आहे. त्यासाठीच संघ परिवार आणि भाजपा अयोध्येतील राममंदिर लोकर्पण सोहळ्यासाठी धडपडताना दिसतो आहे. निवडणुकीसाठी संघटन आणि धन व जात दांडगेपण लागते. भाजपा त्यासाठी सिद्ध झाला आहे. काँग्रेसही निधी संकलनासाठी क्यूआरकोड नाचवताना दिसते आहे. भारत ही जगातील मोठी लोकशाही आहे. अनेक भाषा, विविध प्रांत, निरनिराळे पक्ष, विविध जाती-जमाती, निष्ठा यामुळे या निवडणुकीला नेमका असा कोणताही फॉर्म्युला नाही. गणितात एक अधिक एक दोन असे होत असले तरी राजकारणात तसे होतेच असे नाही. कदाचित एक अधिक एकचे उत्तर शून्य येते किंवा एक अधिक एकचे उत्तर तीनही होऊ शकते. त्यामुळे जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीचा अंदाज कुणालाही गवसत नाही व हे निवडणूक नाट्या नेहमीच जगाचे आकर्षण ठरत आले आहे. देशपातळीवर भाजपा आणि मित्रपक्ष यांची महायुती आणि काँग्रेस आणि अन्य भाजपा विरोधी पक्ष यांची महाआघाडी ज्याला इंडिया असे नाव आहे यांच्यात सामना रंगणार आहे. पण देशभर दुरंगीच लढती होतील असे वाटत नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळे नेते व संघटना वेगवेगळ्या भूमिका घेऊन मशागत करताना दिसत आहेत. ओघानेच ही निवडणूक बहुरंगी तर होईलच पण प्रेक्षणीय आणि लोकांची मानसिकता दर्शवणारी ठरेल यात शंका नाही. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते देवेंद्र फडणवीस राज्यात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकणार असे रोज सांगत आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांनी सोबत घेत राज्यातील मराठा समाज आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात आरक्षणावर मराठा समाज व ओबीसी समाज आक्रमक बनला आहे. नव्याने उदयाला आलेले आणि मराठा समाजाचे ह्दयसम्राट बनलेले जरांगे-पाटील मुंबईत उपोषण करणार, मुंबईत तीन कोटी मराठे जमवणार असे सांगत आहेत. त्यांनी विक्रमी उपस्थितीच्या सभाही घेतल्या आहेत आणि मराठा समाजाने आरक्षण मुद्द्यावर मागे विक्रमी मूकमोर्चा काढले होते. राज्यात मराठा व ओबीसी समाज संघटीत व जागरुक आहे. तो व त्यांचे नेते कसा निर्णय करतात यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार आहोत असे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे शपथा घेऊन सांगत आहेत. तथापि प्रत्यक्षात ते होत नाही तोपर्यंत मराठा नेते विश्वास ठेवायला तयार नाही. मराठा व ओबीसी असा संघर्षही यातून पुढे आला आहे आणि राज्य सरकारची कसोटी लागली आहे. त्यामुळे या विषयात राजकारण शिरले असून कुणीही नेता वा पक्ष हा विषय नाजूकपणे हाताळताना दिसतो आहे. इंडिया आघाडी आणि भाजपा महायुती यांचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत पण घोषणा झालेली नाही. जागा वाटपावर संघर्ष आहे. चिन्हाचाही प्रश्न आहे. बारामती वगैरे जागा लक्षवेधी ठरणार हे वेगळे सांगायला नको. तेथे तर रणवाद्याची जुगलबंदीच सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी भाजपा जोडो नंतर आता भारत न्याय यात्रा करणार अशी घोषणा केली आहे. संक्रांतीपासून राहूल गांधी मणिपूरमधून या भारत न्याय यात्रेला प्रारंभ करणार आहेत. देशात पूर्व-पश्चिम अशी ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडीसा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्dयाप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र अशा 14 राज्यातून जाणार आहे. ही यात्रा निवडणुकीसाठीची नाही असे काँग्रेस म्हणत असली तरी तो ताकाला जाऊन मोगा  लपवण्यातला प्रकार आहे. राजकारणी मंडळी हे सत्ताकारण, अर्थकारण यासाठीच सारे करतात हे शेंबड्या पोरालाही ज्ञात आहे. वर्ष अखेर संपली की मकरसंक्रांतीपासून साऱ्या मोहिमा सुरु होतील. भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना भाजपाच्या बाजूने मतदानात दहा टक्के मतदान वाढवा असे आवाहन केले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय करणार, आमदारांच्या अपात्रतेबद्दल काय निर्णय होणार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय काय निवाडा करणार हे मूलभूत प्रश्न आहेतच. त्यामुळे 22 जानेवारीला रामजन्मभूमीवरील भव्य राममंदिराचे उद्घाटन आणि 26 जानेवारीचे झेंडावंदन झाले की रणधुमाळी सुरु होणार हे स्पष्ट आहे. सत्तेचा मुकूट सर्वानाच हवा आहे. विरोधी बाकावर बसण्यात कुणालाच स्वारस्य नसते. देश आणि देशाचा विकास हवा तर केंद्रात भक्कम व एक विचाराचे सरकार गरजेचे असते. त्यामुळे जनता कुणाला कौल देते हे महत्वाचे. भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर असणार असे सांगत मोदींनी ‘ये मोदी की गॅरंटी“ आहे असे म्हटले आहे. दोन वेळा मोदी व भाजपाला सत्ता देणारे भारतीय मतदार पुन्हा त्यांना निवडणार का? हा जसा प्रश्न आहे तसा इंडिया आघाडीला नेता कोण आणि त्यांचा कार्यक्रम काय हा सुद्धा विषय आहे. तूर्त निवडणूक रणवाद्ये वाजू लागली आहेत आणि राजकीय पक्ष डावपेच आणि रणनिती आखताना दिसत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article