For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रणवाद्ये वाजू लागली

06:49 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
रणवाद्ये वाजू लागली
Advertisement

भारतीय जनता पक्षाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीचे सेनापतीपद ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र निवडणूक जिंकायचीच असा त्यांचा निर्धार स्वाभाविक असला तरी ही निवडणूक आता आरपारची बनली आहे. काश्मिरसह हरियाणात निवडणूक अखेरच्या टप्प्यात आहेत, तेथे काय निकाल लागणार याचा परिणाम महाराष्ट्राच्या निकालावर होणार आहे. ओघानेच या आर पारच्या लढाईसाठी महायुतीकडून नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाआघाडीकडून राहुल गांधी सरसावले आहेत. हा लढा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असाच उभा राहणार हे स्पष्ट दिसते आहे. राहुल गांधी 5 तारखेपासून कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते कॉंग्रेसचा अघोषित प्रचार प्रारंभच करतील, जोडीला त्यांनी संविधान बचाव परिषद योजली आहे तर नरेंद्र मोदी याच दिवशी ठाणे दौऱ्यावर आहेत तेथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे, अमित शहा गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र दौरा करुन रणनीती आखून गेले आणि लगोलग परत आले आहेत. पहिल्या दौऱ्यात त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचा आढावा घेतला आणि या दौऱ्यात मुंबई आणि कोकणचा आढावा घेताना ते दिसले. महायुती आणि महाआघाडी यांचे जागावाटप अंतिम टप्प्यावर आहे आणि नवरात्रात पहिली, दुसरी यादी जाहीर होईल असे दिसते आहे. यादी जाहीर होताच इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु होणार हे वेगळे सांगायला नको. महाआघाडीचे सरसेनापती अमित शहा राहतील. महायुतीचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार तर महाआघाडी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असे दिसते आहे. ओघानेच मुख्यमंत्रीपदाचे नाव पुढे करुन कुणी या मैदानात उतरणार नाही. दिल्लीतून हायकमांड सांगतील तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी दोन्ही बाजूची अवस्था आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. अमित शहा यांनी जी भाषणे केली, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, टीप दिली ती पाहता जिंकायचे असेल तर महायुती एकसंध हवी आणि विदर्भ जिंकलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आता नेते इनकमिंग पेक्षा बूथचे कार्यकर्ते आपले करा. जागावाटपासाठी भांडत बसू नका. जिंकण्यासाठी सर्व शक्तीने मैदानात उतरा, बूथ मॅनेजमेंट आणि मतदान यावर भर हवा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करा, आदी सूचना केल्या. अमित शहा यांनी आणखी एक वक्तव्य केले, त्यामुळे महायुतीतील घटकपक्षांनी कान टवकारले आहेत. शहा म्हणाले ही 24 ची निवडणूक भाजपा घटकपक्षासह लढेल पण 29 ची लढत भाजपा स्वबळावर सत्ता प्राप्त करेल. प्रत्येक पक्षाला विस्तार आणि शक्ती वाढवण्यासाठी संधी हवी असते पण शहा यांच्या या वक्तव्यातून अनेक अर्थ निघत आहेत, त्यांना महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपात सहभागी व्हावे, कमळ चिन्हावर लढावे असे वाटत असणार किंवा जागावाटपात अडथळे आणणाऱ्या घटक पक्षांना दमात घेणे असा इशारा असणार. दसरा झाला की निवडणूक घोषणा होणार अशी सुस्पष्ट चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणूक पुढे जाणार, राष्ट्रपती राजवट येणार या चर्चा मागे पडल्या आहेत. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपला बरे यश आले तरी बहुमतांची सत्ता स्थापन करता येणार नाही असे अंदाज येत आहेत. राहुल गांधींचे नाणे तेथे चालताना दिसत आहे. या निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकतो, या तीन राज्यात व पुढे पाच राज्यात कसे कौल मिळतात यावर केंद्रातील सरकारची स्थिरता टिकणार आहे. ओघानेच महाराष्ट्रातील निवडणूक भाजपसाठी आरपारची तर युती आघाडीतील घटकपक्षासाठी अस्तित्वाची लढाई ठरु शकते. महाराष्ट्रातील पवार कंपनी जिकडे सत्ता तिकडे आम्ही अशा पवित्र्यात कायमच असते. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपा सावध आहेत. काँग्रेसने जोर केला तर घटक मित्रपक्ष मागे पडतात हे वेगळे सांगायला नको, हरियाणामध्ये आप वगैरे खूप मागे पडले असे दिसते आहे. ओघानेच महाराष्ट्रातील छोटे छोटे पक्ष, संघटना फार काळ तग धरतील असे वाटत नाही. शरद पवार यांनी मध्यंतरी देशपातळीवरच्या लहान पक्षांना कॉंग्रेसमध्ये सामिल व्हावे असे आवाहन केले होते, त्यांचा रोख शिवसेनेकडे होता. काँग्रेस उभारी घेऊ लागली तर अशी लाट येऊ शकते आणि पाठोपाठ बंडखोरी व पाडापाडीचे राजकारणही उचल खाते.

Advertisement

आता पक्षपंधरवडा संपला आहे. नवरात्र सुरु आहे. शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडी सुरु होतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, पंकजा मुंढे, मनोज जरांगे आदींचे दसरा मेळावे पुढे आहेत. या मेळाव्यात राजकीय दळणच दळले जाणार की महाराष्ट्र हित, वैचारिक दिशा सांगितली जाणार हे बघावे लागेल. पण दसऱ्याच्या आधीपासूनच राजकारण ढवळून निघणार. भाजपने महिला, ओबीसी, मागास व सरकारी योजनांचे लाभार्थी यांना सोबत घेतले आहे. आघाडीने मराठा, मुस्लिम आणि मागास यांना

भाजपा विरोधी केले आहे. अलीकडे कुणाला निवडून आणायचे यापेक्षा कुणाला पाडायचे हे ठरते. लोकसभा निवडणुकीत संविधान व आरक्षण धोक्यात आहे व इस्लाम धोक्यात आहे अशी लाईन कॉंग्रेसने चालवली ती महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी झाली. विधानसभेलाही तीच आघाडीची प्रचारलाईन दिसते आहे. पण राहुल गांधींचे विदेशातील भाषण आरक्षणावरचे मत हा भाजपाने प्रचार मुद्दा केला आहे. लाडकी बहीण सारखीच कॉंग्रेसची कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजना अडचणीत आहे.

Advertisement

महायुती शिंदे सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पापासून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व वर्गाला खुश करायचे ठरवले व निर्णय घेतले. शेतकरी, महिला, मागासवर्गीय, ओबीसी, ज्येष्ठ  नागरिक यांच्या हिताचे व मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रत्यक्ष रणधुमाळी सुरु होईल आणि डाव प्रतिडाव खेळले जातील. महाआघाडीत उद्धव ठाकरे यांना मोठ्या भावाचा मान, जागा आणि चेहरा मिळालेला नाही. ठाकरे कॉंग्रेसच्या सांगली कडेगांव मेळाव्याला आलेले नव्हते. आता ते राहुल गांधींच्या उपस्थितीत कोल्हापूरला होणाऱ्या कॉंगेसच्या संविधान बचाव परिषदेला हजर राहतात का हे बघायचे. तूर्त ढोल ताशे आदी रणवाद्ये वाजायला लागली आहेत. मतदार सारे बघतो आहे.

Advertisement
Tags :

.