For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रणवाद्ये वाजू लागली

10:41 PM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
रणवाद्ये वाजू लागली
Advertisement

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन अडीच महिन्यांवर आली आहे. ओघानेच राजकीय रणभूमीवर रणवाद्ये वाजू लागली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शरद पवार, उद्वव ठाकरे आणि राहूल गांधी यांच्या कॉंग्रेस महाआघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाल्याने महाआघाडी आता महाराष्ट्र ताब्यात घेणार असे वातावरण आहे. महाराष्ट्र ताब्यात आला तर मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न पडणे चूक नाही. या प्रश्नाचे उत्तर जसे घटकपक्ष व इच्छुकांना हवे असते तसे ते मतदारांनाही हवे असते, पण शरद पवारांसह सर्व नेत्यांनी ‘आधी लगीन कोंडाण्याचे’ अशी भूमिका घेत आमच्यात लहान भाऊ, मोठा भाऊ कोणीही नाही, आम्ही जणू तिळे भाऊ आहोत अशी भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. पण शरद पवारांना आपली मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून निवडायची आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही. उद्धव ठाकरे यांनाही या पदावरून दूर व्हावे लागल्याने मी हे पद पुन्हा हिसकावून मिळवले हे दाखवायचे आहे तर कॉंग्रेसकडेही इच्छुकांची संख्या कमी नाही. नाना पटोले, बाळासाहेब थोरातपासून अगदी बाळासाहेब तथा विश्वजीत कदम यांचे पर्यंत सर्वांना ही खुर्ची हवी आहे. ओघानेच जागावाटप आणि नेतृत्व यासाठी हालचाली सुरु आहेत. कॉंग्रेसने मुंबईतील 20 जागा मागितल्या आहेत. उध्दव ठाकरे यांना कॉंग्रेसचा सांगली पॅटर्न माहीत झाला आहे. त्यामुळे यावेळी सेना एकतर्फी घोषणा व आपलेच म्हणणे रेटणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच खा. विशाल पाटील आणि नेते विश्वजीत कदम यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. आता ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामागे जागावाटप आणि नेतृत्व यासाठीचे फासे टाकले जातील हे स्पष्ट आहे. कॉंग्रेस हाच देशातील प्रमुख विरोधी पक्ष हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झालेने कॉंग्रेसशी जूळवून घेताना घटक पक्षांना कॉंग्रेसला गृहित धरणे आता अवघड झाले आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कॅप्टन असतील असे जाहीर केले आहे. तथापि मुख्यमंत्री म्हणून संधी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि अजितदादा आदी मंडळी तयारीत आहेत. पण हे सर्व निकालानंतरचे विषय आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या तापत्या तव्यावर शरद पवार आणि महाआघाडी नेत्यांनी लोकसभेची आपली पोळी शेकून घेतली. आता विधानसभा निवडणुकीला तीच चूल वापरायची असे धोरण दिसते पण आता भाजप महायुती आणि जरांगे सावध झाले आहेत.

Advertisement

नारायण राणे, निलेश राणे, प्रसाद लाड अशी भाजपाची एक टिमच या प्रश्नी शरद पवार आणि जरांगे पाटील यांना उघडे पाडू पहाते आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एकला चलो’चा नारा देत मनसे दोनशे जागा लढवणार अशी घोषणा केली आहे. जरांगे यांनीही मराठा समाज 200 जागा लढवणार असे म्हटले आहे. जरांगे, राजू शेट्टी आणि बच्चू पाटील एकत्रित येतील असे दिसते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधव अस्वस्थ आहे. आपल्या आरक्षण ताटातच जेवणारी संख्या वाढली तर आमचा ओबीसी समाज उपाशी राहील यासाठी छगन भुजबळ, लक्ष्मण हाके वगैरे नेते सावध झाले आहेत. ओघानेच निवडणूक पूर्व रणवाद्ये जोरात वाजायला लागली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षण गरजेचे नाही असे म्हणत या विषयातील हवा काढून घेतली आहे. आपण जात पात मानत नाही. माझ्यावर तसले संस्कार नाहीत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती माझी आहे. महाराष्ट्रात राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मुला मुलींना नोकरी, उद्योग देण्याची क्षमता आहे. शेतकऱ्याचे व ग्रामीण महाराष्ट्राचे भले करण्याची शक्ती आहे पण शासनाचा सारा पैसा ठराविक चार शहरांवर आणि राज्यातील नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात घातल्या जात आहेत. महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, कुणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही असे राज्य उभे करतो अशी साद ते मतदारांना घालत आहेत. शरद पवारांनी आजवर मराठा समाजाला कसे वापरुन घेतले हे पण ते सांगत आहेत. तथापि महाराष्ट्राला आरक्षण गरजेचे नाही या विधानानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे यांना टाडा लावा अशी मागणी केली आहे. तर मराठा समाजाने तातडीची प्रतिक्रिया म्हणून राज ठाकरे ज्या हॉटेलला उतरले त्याला घेराव घालून घोषणाबाजी केली होती. भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा पदाधिकारी महासंमेलन घेऊन ‘खोट्या प्रचाराला जशास तसे उत्तर द्या, आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा’ असे म्हटले होते. महाराष्टाचा मणिपूर होईल असे विधान शरद पवार यांनी केले आहे. तापलेले वातावरण, जाती पातीत दुभंगत असलेला महाराष्ट्र, ओबीसी विरुद्ध मराठा असे वातावरण यातून नेमके काय होईल हे सांगणे कठीण झाले आहे पण महाराष्ट्र ही संतांची, सलोख्याची आणि समरसतेची भूमी आहे हे विसरता कामा नये. तथापि राजकीय पोळी भाजण्यासाठी कुणी कोणत्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही. अशावेळी आपल्या गावातील एकता, एकात्मता व गावकी टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज ठाकरेंनी मराठवाडा दौरा सुरु केला आहे. त्यांनी उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीतर्फे  वीस तरुण मैदानात उतरवण्याचा चंग बांधला आहे. अजितदादा पवार यांचीही यात्रा सुरु आहे. छगन भुजबळ व लक्ष्मण हाके यांची ओबीसी संघर्ष यात्रा सुरु आहे. जरांगे पाटील यांची शांतता यात्रा तूळजापूर, सोलापूरातून पश्चिम महाराष्ट्रात येते आहे. स्वत: मुख्यमंत्री आणि त्यांचे अख्ख मंत्रीमंडळ रात्रीचा दिवस करते आहे. लाडकी बहिण, शेतकऱ्यांना मोफत वीज, साखर कारखान्यांना केंद्राची मदत, पूरग्रस्तांसाठी मदत, असे विषय घेऊन त्यांनी विधानसभेची जुळणी केली पाहिजे. एकुणच समोर ठाकलेल्या विधानसभा निवडणुकीची रणभूमी आकार घेत आहे. निवडणूका अनेक रंगी होतील असे प्रथमदर्शी वाटत आहे. जरांगे आणि राज ठाकरे यांचे स्वतंत्र उमेदवार आणि वंचित व ओबीसी भूमिका याचा या निवडणुकीवरही परिणाम होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारांचा जसा कस लागणार आहे, तसा काही राजकीय नेते व त्यांचे पक्ष यांच्या अस्तित्वाचाही कस लागणार आहे. अजून चित्र स्पष्ट नाही पण यात्रा आणि  रणवाद्ये वाजू लागली आहेत. सकृतदर्शनी भीतीदायक वातावरण दिसू लागले आहे. अशावेळी महाराष्ट्र काय करतो याकडे सर्व देशांचे लक्ष आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.