गुंजी ग्रा. पं.च्या वतीने हॉटेलचालकांना स्वच्छतेविषयी बैठकीत मार्गदर्शन
वार्ताहर/गुंजी
येथील हॉटेलचालक आणि चिकन-मटन सेंटर चालकांना गुंजी ग्राम पंचायतीच्यावतीने स्वच्छता आणि कचरा विल्हेवारीबद्दल गुंजी ग्राम पंचायत अध्यक्षा स्वाती गुरव आणि पीडीओ प्रीती पत्तार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत उपयुक्त मार्गदर्शन केले. येथील हॉटेलचालकांनी ग्राहकांना सेवा पुरविताना ताज्या खाद्यपदार्थांबरोबरच स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे. कोणतेही खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवू नयेत. ग्राहकांच्या मागणीनुसार गरम पाणी द्यावे. सुका व ओला कचरा वेगळा करूनच संकलन करावा आणि तो कचरा गाडीतच टाकावा. दूषित पाणी अन्यत्र न टाकता गटारीतच सोडावे. चिकन व मटन दुकानदारांनी निरोगी कोंबड्या व बकऱ्यांचा वापर करावा. टाकाऊ घटकांची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी उपस्थित हॉटेलचालकांनी प्रतिसाद दिला असला तरी कचरा संकलन करताना हॉटेल चालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. कचरा गाडी दोन दिवसांनी फिरत असल्याने संकलित कचऱ्यातून दुर्गंधी येते. त्याकरिता ग्राम पंचायतीने दोन दिवसाआड फिरणारी कचरा गाडी दररोज नियमित वेळेत सोडण्याची मागणी केली.
कचरा संकलनासाठी प्रति महिना पन्नास रुपये
सध्या फिरणाऱ्या कचरा गाडीसाठी लागणारा खर्च आणि त्यावरील कर्मचाऱ्यांचे गौरवधन हे ग्राम पंचायत देत आहे. मात्र पुढील महिन्यापासून सदर कचरा गाडी ही सरकारी आदेशानुसार स्वसहाय्य संघांच्या प्रतिनिधींकडून चालवण्यात येणार आहे. त्याकरिता प्रति कुटुंबाकडून वीस रुपये महिना आणि हॉटेल, चिकन-मटन व दुकानदारांसाठी पन्नास रुपये प्रति महिना गोळा केले जाणार आहेत. त्यामधूनच गाडी व कर्मचाऱ्यांच्या गौरवधनाचा खर्च केला जाणार आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व हॉटेलचालकांनी प्लास्टिकचा वापर बंद करावा. यासाठी ग्राम पंचायत अध्यक्षा स्वाती गुरव यांच्याकडून कागदी पाकिटे आणि हातमोजे देऊन देऊन जागृती आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रा. पं.सदस्या सरोजा बुरुड, अन्नपूर्णा मादार, राजश्री बिरजे, श्रावणी शास्त्राr व गुंजीतील सर्व हॉटेलचालक उपस्थित होते.